मतदानासाठी पैसे घेणार्यांचे प्रमाण पोहचले 40 टक्क्यांवर; सधनवर्गही पैशांच्या मोहासाठी करतोय धडपडfile photo
Published on
:
20 Nov 2024, 9:26 am
Updated on
:
20 Nov 2024, 9:26 am
जयदीप जाधव
लोकशाहीतील प्रमुख दान म्हणजे ’मतदान’; परंतु या पवित्र दानाचा सौदा करण्याचे प्रमाण आता 40 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखेरच्या दिवसांत निवडणूक जिंकण्याची समीकरणे आखली जात आहेत. या समीकरणांत पैसा हा मोठा प्रभावी फॅक्टर असून, विधानसभेसाठी ग्रामपंचायतीप्रमाणेच पैसेवाटपाचा मोठा पॅटर्न समोर आला आहे.
एकूण मतदारांपैकी सुमारे 40 टक्के मतदार उमेदवारांकडून पैसे घेण्यासाठी धडपडत असल्याची विदारक परिस्थिती या निवडणुकीनिमित्त समोर आली आहे. निवडून येणार्या उमेदवारांकडून आपल्या मूलभूत प्रश्नांची व विकासाची अपेक्षा ठेवायची काय? असा प्रश्न समोर आला आहे.
पाच वर्षांतून एकदा येणार्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असताना मतदारांना मोहित करण्यासाठी पैसेवाटप करण्याचा फॉर्म्युला समोर आला आहे. पण, हा फॉर्म्युला काही थोड्या फार मतदारांना मोहित करेल, असा कयास असताना वास्तवात मतदानासाठी पैसे घेणार्यांची संख्या एकूण मतदारांच्या 40 टक्के इतक्यावर पोहचल्याचे भयानक वास्तव विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उघड बोलत आहेत. या मतदारांनी आपली भौतिक कुवत अगदी हजार, पाचशे इतक्या रुपयांत खुंटीवर लटकवली आहे.
या मतदारांत सुशिक्षित ,धनदांडगे, नोकरदार व राजकीय पदे भोगणार्यांचाही भरणा आहे. काही खुलेआम तर काही ऑनलाइन प्रणाली वापरून वाच्यता न होता तुटपुंजी रक्कम घेऊन आपली हौस भागवत आहेत.
लोकशाही प्रक्रियेला सुदृढ करण्यासाठी मतदान करणे हे सामाजिक कर्तव्य असले, तरी या कर्तव्याच्या आडून आपला हक्क पैशाने विकण्याचा पायंडा समाजात रूढ होत आहे. या प्रकारात एक विशिष्ट वर्ग असल्याचे यापूर्वी बोलले जात असले, तरी पैशांचा मोह बाळगणारा मोठा वर्ग आता समोर आला आहे. या वर्गाचा एकूण रेशो 40 टक्कांपर्यंत पोहचला आहे. या वर्गातून नि:संकोचपणे पैसे मागण्यासाठीची धडपड मतदान होण्याच्या दोन दिवसांपासून सुरू असल्याचे दिसते. राजकीय पदाधिकारी याद्या बनवून मतदारांची फर्माईश पूर्ण करत आहेत.
पैसे वाटपासाठी आता विविध शक्कल
प्रत्येक तालुक्यात मागील काळात बाजार समिती, कारखाना व ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत. या सर्व निवडणुकांत पैसेवाटपाचे नवनवे फॉर्म्युले निघाले आहेत. काही टप्प्यांत मतदारांची सतत हौस पुरवायची, असा एक प्रयत्न असतो. अशा प्रयत्नात पहिला हात, दुसरा हात, मॉर्निंग पॅकेज व मतदान संपल्यानंतर एक पॅकेज, असा वाटपाचा प्रकार सुरू आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी ते मतदारांपर्यंत सर्वांना खूष करण्याचा प्रयत्न उमेदवार करत असल्याची चर्चा आहे.
बारामतीतही वाटप
बारामती मतदारसंघ या वाटपसंस्कृतीपासून दूर असलेला मतदारसंघ होता. किमान लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तरी या मतदारसंघात पैसे किंवा इतर भेटवस्तू वाटपाचा प्रकार होत नव्हता. या वेळी मात्र लोकसभेनंतर बारामतीला विधानसभेतही रेकॉर्ड ब्रेक वाटप झाल्याची चर्चा आहे.