कोल्हापूर : मराठी चित्रपट ‘रानटी’ च्या कलाकारांनी मंगळवारी दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला.
Published on
:
19 Nov 2024, 8:36 pm
Updated on
:
19 Nov 2024, 8:36 pm
कोल्हापूर : पुनित बालन स्टुडिओनिर्मित ‘रानटी’ हा मराठीतील सर्वात मोठा अॅक्शनपट येत आहे. शुक्रवारी (दि.22) प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास अभिनेता संतोष जुवेकर यांनी व्यक्त केला.
जुवेकर यांच्यासह या चित्रपटातील कलाकार नागेश भोसले, जयवंत वाडकर यांनी ‘दै. पुढारी’च्या मुख्य कार्यालयास मंगळवारी भेट दिली. यावेळी त्यांनी संवाद साधत ‘रानटी’ चित्रपटाचा प्रवास उलगडला. जुवेकर म्हणाले, याआधीही अॅक्शन फिल्म्स खूप आल्या. पण, काळानुरूप गोष्टी बदलत गेल्या आणि तलवार, कुर्हाडी ऐवजी बंदुक, कट्टे आले. अॅक्शनपटाची दिशा बदलली. मराठी चित्रपट ‘रानटी’मधील अॅक्शन प्रकार वेगळा आहे. या अॅक्शन प्रेक्षकांनाही आवडतील. मराठीत साऊथसारखे अॅक्शन सिनेमे आलेले नाहीत. पण, येऊ घातलेला हा चित्रपट सिनेरसिकांच्या मनावर नक्कीच रुंजी घालेल.
भोसले म्हणाले, चित्रपटाची व्याप्ती मोठी आहे.
मुख्य अभिनेता शरद केळकर आणि समित कक्कड यांनी खूप वर्षे काम केलं आहे. अखेर या चित्रपटाची कथा पुनित बालन यांना आवडली आणि त्यांनी चित्रपटाला होकार दिला. उत्तम मराठी सिनेमे आपणही आणू शकतो. हा मराठी सिनेमा लोकांना नक्कीच आवडेल, असेही त्यांनी सांगितले. वाडकर म्हणाले, पुनित बालन यांनी चित्रपट, वेबसीरिज केले. आता त्यांनी अॅक्शन चित्रपट आणण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. अभिनेते संजय नार्वेकर यांनी साकारलेली खलनायिकाची भूमिका ही खूप उत्तम साकारली आहे. उत्तम संगीत, उत्तम फाईट अॅक्शन्ससाठी अनुभवी आणि तज्ज्ञांनी रात्रं-दिवस काम केल्याचे ते म्हणाले. दैनिक पुढारीचे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर यांनी कलाकारांचे स्वागत केले.
पुनित बालन यांना सिनेमांची उत्तम जाण
शरद आणि समित यांच्याकडे ही स्क्रीप्ट 5 वर्षांपासून होती. पण, स्क्रीप्टसाठी लागणारी गुंतवणूक करणारा निर्माता मिळत नव्हता. निर्माते पुनित बालन यांनी या सिनेमाची पूर्ण प्रोसेस समजून घेतली. त्यांनी सिनेमाची उत्तम जाण असल्याने त्यांनी हा सिनेमा हाती घेतला. मराठीत एक नवा ट्रेंड सेटर सिनेमा येत असेल, तर आपण त्यात वाटा उचलला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी हा सिनेमा हाती घेतला, अशा शब्दात संतोष जुवेकर यांनी निर्माते बालन यांचे कौतुक केले.
टोमॅटो एफएमवरून साधला प्रेक्षकांशी संवाद
‘रानटी’च्या कलाकारांनी टोमॅटो एफएमला भेट दिली. सर्व कलाकारांचे स्वागत करण्यात आले. यानंतर कलाकारांनी टोमॅटो एफएमवरून चित्रपटाविषयी प्रेक्षकांशी संवाद साधला.
प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे आवाहन सर्व कलाकारांनी केले. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीला सुद्धा अँग्री यंग मॅन अॅक्शन हिरो मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.