विधानसभा निवडणुकीसाठी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पालिकेच्या 60 हजार कर्मचारी-अधिकाऱयांसह तब्बल एक लाखांवर कर्मचाऱयांनी बहुमूल्य योगदान देत गोंधळ न होता मतदान सुरळीतपणे पार पडले. यामध्ये आज मतदानाच्या दिवशी मुंबईतील 36 मतदारसंघांतील 10 हजार 117 मतदान केंद्रांवर पालिका मुख्यालयाच्या कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेवण्यात आले. पालिका आयुक्त गगराणी यांच्यासह पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुख्यालयातील वेबकास्टिंग नियंत्रण कक्षातून मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.
विधानसभा निवडणुकीसाङ्गी पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये मतदान केंद्रांवर मतदारांसाङ्गी निश्चित किमान सुविधा, रांगेमध्ये ठरावीक ठिकाणी आसन व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, मेडिकल किट, मतदारांच्या सहकार्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधाही पालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या. मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या विविध नागरी सेवासुविधांनी मुंबईतील मतदार सुखावल्याचे चित्र दिसून आले, तर मतदान केंद्रांवर उत्तम प्रकारच्या सेवासुविधा पुरविल्याबद्दल नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रशासनाचे कौतुक केले. दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी पालिका कर्मचारी, शासकीय, अशासकीय संस्था, आस्थापनांचे आभार मानले.
– प्रशासनाच्या वतीने मुंबईतील विविध मतदारसंघांमध्ये 84 मॉडेल मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यामध्ये संपूर्णतः युवा कर्मचाऱ्यांद्वारा संचालित, महिलांद्वारा संचालित तसेच दिव्यांगाद्वारा संचालित मतदान केंद्रांचा समावेश होता. विलेपार्ले येथील सेंट झेवियर्स माध्यमिक शाळेत सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. हे संपूर्ण मतदान केंद्र फुलांनी सजविण्यात आले होते, तर अनेक ठिकाणी मतदारांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.
– मतदारांच्या मदतीसाठी 7 हजार 115 स्वयंसेवक विविध मतदान केंद्रांवर कार्यरत होते. यामध्ये 98 महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी 2 हजार 800 विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) 750 विद्यार्थी, नागरी संरक्षणातील 323 सदस्य, आपदा मित्र/सखी 200, नेहरू युवा केंद्राचे 38 सदस्य आणि अन्य 3 हजार 004 सदस्य यांचा समावेश होता.