महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? कधी आहे मुहूर्त?; दीपक केसरकर यांनी तारीखच सांगितली

2 hours ago 1

Maharashtra Government Formation Date : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल लागून 7 दिवस उलटले आहेत. या निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. तर महाविकासआघाडीचा मात्र सुपडासाफ झाला. महायुतीला 236 जागांववर विजय मिळाला असून भाजपला सर्वाधिक 132 तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आता नुकत्याच झालेल्या बैठकीत महायुतीच्या मुख्यमंत्रि‍पदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यातच आता महायुतीतील एका नेत्याने यावर मोठे वक्तव्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी महायुतीच्या मुख्यमंत्र्‍याचा शपथविधी कधी होणार? सत्तास्थापनेचा दावा कधी केला जाणार? यावर भाष्य केले आहे. “सध्या चांगला मुहूर्त नाही, येत्या २ तारखेपासून चांगले मुहूर्त आहेत”, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. यामुळे २ डिसेंबरनंतर नव्या मुख्यमंत्र्‍याचा शपथविधी होऊ शकतो असे बोललं जात आहे.

“येत्या २ तारखेपर्यंत कोणताही चांगला मुहूर्त नाही. सध्या मुहूर्त नाही. २ तारखेनंतर जेव्हा चांगला मुहूर्त असेल तेव्हा सरकार स्थापन होईल. २ डिसेंबरनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक लोक या शपथविधीसाठी उपस्थितीत राहू शकतात. त्यांच्या सुविधेप्रमाणे सगळं ठरविला जाईल”, असे दीपक केसरकर म्हणाले.

“नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसोबतही चांगले संबंध”

“एकनाथ शिंदेंचे केंद्र सरकारसोबत चांगले संबंध आहेत. त्यासोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसोबतही चांगले संबंध आहेत. शिंदे साहेबांचा योग्य सन्मान ठेवला जाईल, असं दिल्लीतून सांगण्यात आलं आहे. आम्हाला तेवढं पुरेसे आहे, त्यांचा सन्मान म्हणजे आमचा सगळ्यांचा सन्मान आहे. एवढं बहिणींचा प्रेम आजपर्यंत कुणालाही मिळू शकलं नाही. लाडकी बहीण त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, अनेक योजना केल्या आहेत”, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

“मी शिंदेंच्या मागे ठामपणे उभे राहणार”

“उद्धव ठाकरे पॅलेसमध्ये राहतात, त्यांची पॅलेस पॉलिटिक्स आहे. त्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला आहे. त्यांनी आत्मपरिक्षण करावं. दिल्लीबद्दलच्या घडामोडींबद्दल मला काहीही कल्पना नाही. मी शिंदेंच्या मागे ठामपणे उभे राहणार आहे. अमित शाह सांगतील, त्याप्रमाणे काम करायचं आहे. बाळासाहेबांच्या विचारावर चालायचं हे देखील आम्ही ठरवलं आहे”, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article