Published on
:
28 Nov 2024, 5:48 am
Updated on
:
28 Nov 2024, 5:48 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झालं. एकुण मतदानाची एकूण ६५.०२ टक्के इतकी नोंदली गेली. मात्र राज्यात सायंकाळी पाचपर्यंतची टक्केवारी आणि दुसर्या दिवशी जाहीर झालेल्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाल्याचेही स्पष्ट झाले. मतदानाच्या शेवटच्या एक तासात व्यापक तफावतीबाबत माजी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) एस. वाय कुरैशी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ
२० नोव्हेंबर रोजी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ५५ इतकी नोंदली गेली होती. मात्र दुसर्या दिवशी म्हणजे २१नोव्हेंबरला एकूण ६५.०२ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. शेवटच्या तासात तब्बल १० टक्के मतदान वाढले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची वाढलेली टक्केवारी ही मागील तीन दशकातील सर्वोच्च आहे.
काय म्हणाले माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी?
एस. वाय. कुरैशी हे २०१० ते २०१२ या कालावधीत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. 'इंडिया टूडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, मतदारांच्या मतदानाची आकडेवारी रिअल-टाइममध्ये नोंदवली जाते. यंदा महाराष्ट्र विधानसभघ निवडणुकीत हा नोंद मधील प्रचंड तफावत चिंताजनक होती. त्यामुळे मला नक्कीच काळजी वाटते. जेव्हा मतदार मतदानासाठी जातो तेव्हा एक फॉर्म 17A असतो. उपस्थिती अधिकाऱ्याद्वारे चिन्हांकित केली जाते. फॉर्म १७ सी मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झाले याची नोंद केली जाते. हा रिअल-टाइम डेटा त्याच दिवशी नोंदणी केला जातो; मग दुसऱ्या दिवशी डेटा (मतांची टक्केवारी) कसा बदलू शकतो, असा प्रश्नही कुरैशी यांनी उपस्थित केला. तसेच या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकसभा निवडणुकीतही व्यक्त झाली होती चिंता
लोकसभा निवडणूक मे २०२४मध्ये पार पडली. यावेळीही सुरुवातीच्या आणि अंतिम मतदानाच्या आकडेवारीमध्ये ५ ते ६ टक्के तफावत होती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने प्रत्येक मतदान टप्प्याच्या ४८ तासांच्या आत मतदान केंद्रनिहाय मतदानाचा डेटा जाहीर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, व्यावहारिक दृष्टया असणार्या आव्हानांवर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती नाकारली होती.