माजलगावात वाळू माफियांची एसडीओंच्या गाडीला धडक!File Photo
Published on
:
30 Nov 2024, 10:29 am
Updated on
:
30 Nov 2024, 10:29 am
माजलगाव : पुढारी वृत्तसेवा
माजलगावात वाळू माफियांची दादागिरी प्रचंड वाढली आहे. याचा प्रत्यय खुद्द उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या वाट्याला गुरुवार दि 28 रोजी आला. वाळू चोरी रोखण्यासाठी फिरणाऱ्या त्यांच्या गस्तीपथकाच्या वाहनाचा पाटलाग करत वाळू माफियांकडून वाहनाला धडक दिली. दरम्यान यावेळी वाळू माफियांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद गौरव इंगोले यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेवराई च्या तिघाजंणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
माजलगाव तालुक्यात वाळू माफियांनी राजरोसपणे गोदाकाठ उपसण्यास सुरुवात केली आहे. लिलाव नसतानाही सर्वत्र वाळूचे ढिगारे दिसत आहेत. या विरोधात अनेक दैनिकात बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या बातम्यांची दखल घेत माजलगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी गोदाघाटात गस्ती सुरू केली. दि.28 रोजी दुपारी टाकरवन शेलगावथडी दरम्यान त्यांच्या वाहनाला एक कार पाठलाग करत होती. हे लक्षात येताच त्यांनी आपले वाहन थांबवले व विनापरवाना असणाऱ्या त्या कारलाही थांबवले.
यावेळी कारमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्यासोबत अरेरावीची भाषा केली. त्यांच्यासोबत हुज्जत घातली. शासकीय कामात अडचण आणली आणि त्यांच्या गाडीला डॅश मारून निघून गेले. दरम्यान उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 1)करण सोमनाथ मोठे (रा. गेवराई) 2) संजय रामदास पवार (गेवराई) 3)अनंत खरात (घनसावंगी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदरील घटनेने वाळू माफियांची गुंडगिरी कोणत्या थराला गेली आहे हे दर्शवत आहे. यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.