पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी येथील पटेलवाडा पाझर तलावातून अनधिकृत पाणी उपसा सुरू आहे, याकडे जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या भागातील जनतेला पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. माणिकदौंडी, घुमटवाडी, चेकेवाडी, धनगरवाडी, रूपचंदनगर, लांडकवाडी, जक्सूनतांडा, कोकीस्पीरतांडा, वाघाचीवाडी, वंजारवाडी व इतर वस्त्यांना या पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या या तलावातून वीजपंप टाकून व विहिरीचे खोदकाम करून रात्रंदिवस पाण्याचा उपसा सुरू आहे. या उपशामुळे पाणीटंचाईचे संकट उभे ठाकणार आहे. शेतीसह येथील पाणी विक्रीचा प्रकार काही पाणीमाफियांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे सरपंचासह ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यही पाणी उपसत आहेत.
तलावामधून पाणी उपसा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या वीजपंपाला वीजपुरवठा हा सिंगल फेज मधून अनधिकृतपणे घेण्यात येत आहे. महावितरणचे याकडे दुर्लक्ष झाल्याने वीजचोरी करूनपाणी उपसा होत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू असल्याने या तलावाची पाणी पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. जलसंधारण विभागाने वेळीच लक्ष दिले नाही, तर परिसरातील गावांसह वाढीव असताना पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. तलावात मोठ्या संख्येने बेकायदा विहिरी खोदल्या गेल्या आहेत. आत्तापासूनच या तलावातून भरमसाठ पाणी उपसा सुरू असल्याने उन्हाळ्यात तलावात पाणी शिल्लक राहणार नाही.