मायकललोबोंचे लक्ष ‘मांद्रे’वर, तर ढवळीकरांचे फोंडा तालुक्यावर. Pudhari File Photo
Published on
:
19 Nov 2024, 11:56 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:56 pm
पणजी : राज्यात सध्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणे उघडकीस येत आहेत. तर यात गुंतलेल्या विविध‘रॅकेटस्’ची चर्चा चालू असताना विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदारसंघांचीही चाचपणी सुरू झाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीस अजून 2 वर्षे बाकी आहेत मात्र आजी-माजी लोकप्रतिनिधींमधील चलबिचल आतापासूनच वाढली आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी आपला मोर्चा मांद्रे मतदारसंघाकडे वळवला, असून मगोचे कार्याध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आपल्या पारंपरिक फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरू केला आहे. तसा दावाही त्यांनी आज केला आहे.
निवडणुकीस अद्याप 2 वर्षे बाकी असताना काही लोकप्रतिनिधींनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोबो यांनी मांद्रे मतदारसंघात आपली ये-जा वाढवली असून या परिसरातील लोकप्रतिनिधींसह स्थानिकांच्या गाठीभेटी घेणेही सुरू केले आहे. मांद्रे मतदार संघातील स्थानिकांच्या विकासासाठी मी सदैव तयार आहे, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी त्यांनी केले होते. आज त्यांनी जर कळंगुट मतदारसंघातील जनतेला आपण नको असेल, तर आपण मांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवणार, असे जाहीर केले आहे. यावरून विद्यमान आमदार जीत आरोलकर यांनी यावर लोबो यांनी स्वतः लढावे, असे आव्हानही दिले आहे.
दुसरीकडे मगो पक्षाचे कार्याध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आपल्या पारंपरिक फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनीच आज जाहीर केले. या मतदारसंघांपैकी प्रियोळ मतदार संघाचे प्रतिनिधित्व त्यांनी यापूर्वी केले आहे. सध्या या मतदारसंघातून भाजपचे गोविंद गावडे आमदार आणि मंत्री आहेत. फोंडा मतदारसंघावर रवी नाईक यांचे वर्चस्व आहे. तर शिरोडा मतदार संघातून भाजपचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर मंत्री आहेत. याशिवाय महत्त्वाच्या मडकई मतदारसंघातून त्यांचेच बंधू मगो पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर आमदार आहेत. त्यामुळे ते नेमके कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत अस्पष्टता आहे.