Published on
:
23 Nov 2024, 8:05 am
Updated on
:
23 Nov 2024, 8:05 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : "लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची जबाबदारी माझ्यावर होती. महाराष्ट्रात आमचा पराभव झाला आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. जिथे काही कमरता राहिली, त्याची भरपाई केला जाईल. मी पळ काढणारा माणूस नाही, आणखी जोराने मैदानात उतरणार. संपूर्ण पक्षाला एकत्र घेऊन आम्ही नवी स्ट्रॅटजी बनवून जनतेमध्ये जावू.जनतेचा विश्वास संपादित करू," असा निर्धार भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर व्यक्त केला होता. अवघ्या पाच महिन्यांनंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळवून देत हा निर्धार वास्तवात उतरवला आहे. त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले नेतृत्त्व सिद्ध केले आहे. ( Maharashtra Election Results 2024 )
आणखी जोराने मैदानात उतरणार...
२०२२मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंड पुकारले. त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्रित लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनेच बाजी मारली. महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळवला. तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या झालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली. संपूर्ण पक्षाला एकत्र घेऊन आम्ही नवी स्ट्रॅटजी बनवू, आणि जनतेमध्ये जाऊ आणि जनतेचा विश्वास संपादित करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. अवघ्या पाच महिन्यांनंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळवून देत आला निर्धार वास्तवात उतरवला आहे. त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपमधील आपले नेतृत्त्व सिद्ध केले आहे.
मी पुन्हा येईन...! फडणवीसांचा आत्मविश्वास पुन्हा उतरवला वास्तवात
२०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी "मी पुन्हा येईन", असा आत्मविश्वास राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुका झाल्या. तब्बल १०५ जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्षही ठरला;पण सत्तेच्या 'साठमारी'त शिवसेनेने भाजपलाच दूर सारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत थेट सरकारच स्थापन केले. २०२२मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंड पुकारले. यावेळीही "मी पुन्हा येईन...!" ही घोषणा वास्तवात येणार अशी चर्चा पुन्हा झाली; पण मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. मात्र अत्यंत सकारात्मक विचारांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धडाडीने काम सुरु ठेवले. याच काळात 'मी पुन्हा येईन,' या घोषणेची विरोधक खिल्ली उडवत राहिले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निर्धाराकडे मोठा आत्मविश्वासने वाटचाल सुरुच ठेवली. विधानसभा निवडणुकीतही फडणवीस हेच विरोधी पक्षांच्या टीकेचे लक्ष्य होते. मात्र फडणवीस यांनी प्रचाराच्या झंझावात आणि विकास कामांचा निर्धारामुळे पुन्हा एकदा राज्यातील जनतेने भाजप-महायुती सरकारवर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पाच वर्षांनी फडणवीस यांनी आपले नेतृत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २०१९ नंतर त्यांना दोनवेळा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली तरी सकारात्मक राजकारणातून त्यांनी भाजपला घवघवीत यश मिळवून देत मी पुन्हा येईन, हा आत्मविश्वास वास्तवात उतरवला आहे.