मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार:मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती

2 hours ago 1
राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून मराठा समाजाला आम्ही अन् मी स्वत: आरक्षण देणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीच्या वतीने बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही जे बोलतो ते करतो. मी स्वत: ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरक्षण दिले होते, पण ते आरक्षण कुणी घालवले, त्यांना आरक्षण कोर्टात टिकवता आले नाही. आता देखील आम्ही दिलेले आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल होत आहेत. याचिका दाखल करणारे कोण आहेत, ते एकदा पहा, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. मनोज जरांगे यांनी विचार करावा - मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण महायुतीने मराठा समाजाला काय दिले, याबाबतही जरांगे यांनी विचार करावा. महायुतीने सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ तसेच ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सवलती दिल्या आहेत. आधी ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला, त्यामुळे मराठा समाजाला कोणी दिले आणि कोणी वंचित ठेवले, याचा जरांगे यांनी विचार करावा, असेही शिंदे म्हणाले. ‘लाडकी बहीण योजने’ला हात लावला तर करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्व लाडक्या बहीणी सरकारच्या पाठिशी आहेत. ही योजना गेम चेंजर झाली आहे. परंतु विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु, लाडकी बहीण योजनेला हात लावला तर याद राखा…त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे. मराठ्यांना फक्त शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतात दरम्यान, मराठ्यांना फक्त शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतात. मराठ्यांना आरक्षण देणारा तेवढाच धाडसी माणूस आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. महायुतीच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत हे विधान केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article