Published on
:
23 Nov 2024, 5:17 pm
Updated on
:
23 Nov 2024, 5:17 pm
कागल ः कागल विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली. 11 हजार 879 इतक्या मताधिक्याने ते विजयी झाले. त्यांना 1 लाख 43 हजार 828 इतकी मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला. त्यांना 1 लाख 31 हजार 949 मते मिळाली. एकूण 26 फेर्या झाल्या. सुरुवातीच्या दोन फेर्यांमध्ये समरजितसिंह घाटगे यांना अत्यल्प मताचे लीड वगळता कोणत्याही फेरीमध्ये त्यांना आघाडी घेता आली नाही. एकूण 11 उमेदवार रिंगणात होते.
प्रचारामध्ये लाडकी बहिणींचा मुद्दा प्रकर्षाने पुढे करण्यात आला होता. उमेदवारांचे सर्व कुटुंबीय प्रचारात उतरलेले होते. दोन्ही उमेदवारांकडून कार्यकर्त्यांची फोडाफोडी करण्यात आली होती. सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्ष इव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ झाला.पहिल्या फेरीत समरजितसिंह घाटगे यांनी 1133 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर दोन फेर्यांमध्ये मुश्रीफ यांनी 2494 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या फेरीमध्ये 92 आणि 227 मतांची आघाडी घेत मुश्रीफ यांच्या मताची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतर झालेल्या सर्व फेर्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आघाडी घेत मुश्रीफ यांनी विजयाकडे वाटचाल केली. अखेर हसन मुश्रीफ यांनी 11,879 मतांनी विजयाचा षटकार मारला, तर समरजित सिंह घाटगे दुसर्या क्रमांकावर राहिले. त्यांना पराभवाचा दुसर्यांदा सामना करावा लागला.
कागल तालुक्यातील 17 व्या फेरीमध्ये प्रत्येक फेरीत मुश्रीफ यांनी मताधिक्य घेतले. 17 आणि 18 व्या फेरीमध्ये 7,344 इतक्या निर्णायक मतांची आघाडी घेतली. त्यानंतर कोणत्याही फेरीमध्ये घाटगे यांना मताधिक्य मिळाले नाही. गडहिंग्लज शहरासह उत्तूर, कौलगे, कडगाव या मतदारसंघांमध्येदेखील त्यांचा फारसा प्रभाव चालला नाही. घाटगे यांना केवळ 22 व्या फेरीमध्ये 78 मतांची आघाडी मिळालेली होती.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खर्डेकर चौक, गैबी चौकामध्ये गुलाल आणि आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर हसन मुश्रीफ देवदेवतांचे दर्शन घेण्याकरिता तिथून बाहेर पडले व थेट ते मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेऊन जल्लोष केला.
मतमोजणीमध्ये लक्षणीय आघाडी घेतल्यानंतर 19 व्या फेरीनंतर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करण्यास सुरुवात केली. खर्डेकर चौकातील पक्षाच्या कार्यालयामध्ये हसन मुश्रीफ हे तळ ठोकून होते. मतमोजणीच्या ठिकाणाहून मतमोजणीची माहिती घेत होते, तसेच राज्यातील निवडणुकीचे चित्रही पाहत होते.