यवतमाळ जिल्ह्यात महायुतीचाच बोलबाला असल्याचे दिसून आले.
Published on
:
23 Nov 2024, 5:10 pm
Updated on
:
23 Nov 2024, 5:10 pm
यवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (दि.२३) शांततेत पार पडली. निवडणूक निकालानंतर पाच जागा मिळून जिल्ह्यात आजही महायुतीचाच बोलबाला असल्याचे दिसून आले.
या निवडणुकीत भाजपला सातपैकी तीन ठिकाणी विजय मिळाला असून दोन जागा गमावल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने गड कायम राखत पुसदची जागा कायम ठेवली. राळेगाव मतदारसंघात अटितटीच्या लढतीत काँग्रेसच्या प्राध्यापक वसंत पुरके यांचा निसटता पराभव झाला. शिवसेना उध्दव ठाकरे गटाने भाजपला धुळ चारत वणीची जागा पटकावली आहे. येथे उध्दव सेनेच्या संजय देरकर यांनी भाजपकडून दोन वेळा निवडून आलेल्या संजीव रेड्डी बोदकुरवार यांना धूळ चारत दणदणीत विजय मिळविला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढतीत संजय राठोड यांनी विजय मिळवून आपला मतदारसंघ अभेद्य राखला आहे. येथे कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव पक्षाला जिव्हारी लागला आहे. या निवडणूकीत माणिकराव ठाकरे, मदन येरावार, प्रा. वसंत पुरके व संजीवरेड्डी बोदकुरवार या दिग्गज नेत्यांचा पराभव चर्चेत राहिला आहे.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या बाळासाहेब मांगुळकर यांना १ लाख १७ हजार ५९३ मते मिळाली. त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे मदन येरावार यांना १ लाख ५ हजार ९९७ मते मिळाली. यात मदन येरावार यांचा ११ हजार ५९६ मतांनी मांगुळकर यांनी पराभव केला. राळेगाव मतदारसंघात भाजपचे डॉ. अशोक उईके यांना १ लाख १ हजार २० मते मिळाली. तर काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांना ९८ हजार ८० मते मिळाली. येथे डॉ. उईके यांनी २९४९ मताधिक्य मिळविले आहे. केळापूर आर्णी मतदारसंघात भाजपचे राजू तोडसाम यांना १ लाख २७ हजार २०३ मते मिळाली. तर कॉंगे्रसचे जितेंद्र मोघे यांना ९७ हजार ८९० मते मिळाली. मोघे यांचा २९ हजार ३१३ मतांनी पराभव झाला आहे. दिग्रस दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांना १ लाख ४३ हजार ११५ मते मिळाली. तर माणिकराव ठाकरे यांना १ लाख १४ हजार ३४० मते मिळाली. यात संजय राठोड यांनी २९ हजार ८८ मताधिक्य घेतले आहे.
वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा)चे संजय देरकर यांना ९४ हजार ६१६ मते मिळाली. येथील विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना ७९ हजार ५८ मते मिळाली. देरकर यांनी बोदकुरवार यांचा १५ हजार ५६० मतांनी दारूण पराभव केला. पुसद विधानसभा क्षेत्रात रा.कॉं. अजित पवार गटाचे इंद्रनिल नाईक यांना १ लाख २७ हजार ९६४ मते मिळाली. तर रा.कॉं. शरद पवार गटाचे शरद मैंद यांना ३७ हजार १९५ व वंचित बहूजन आघाडीचे माधव वैद्य यांना ३६ हजार ५७५ मते मिळाली. इंद्रनिल नाईक यांनी ९० हजार ७६९ मताधिक्य मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान मिळविला आहे.
उमरखेड विधानसभा क्षेत्रात भाजपचे किसनराव वानखडे यांना १ लाख ८ हजार ६८२ तर कॉंग्रेसचे साहेबराव कांबळे यांना ९२ हजार ५२ मते मिळाली. कांबळे यांचा १६ हजार ६२९ मतांनी पराभव झाला. विजयी उमेदवाराच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून गुलाल उधळत फटाके फोडून प्रचंड जल्लोष केला. या दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.