Published on
:
22 Nov 2024, 2:24 pm
Updated on
:
22 Nov 2024, 2:24 pm
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम टपाली मतपत्रिका मोजल्या जातील. त्यानंतर मशिनचे मतदान फेरीनिहाय मोजले जाणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीची निगराणी राहणार असून मोजणीचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाणार आहे. वैद्यकीय पथक, अग्निशमन व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र मतमोजणी निरिक्षक नेमण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीत मोजणीची प्रक्रिया पार पडेल.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १४ टेबलवर मोजणी होईल. याप्रमाणे निवडणुकीच्या फेऱ्या पार पडतील. टपाली मतमोजणीकरीता मतदार संघनिहाय टेबलची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मोजणीसाठी मतमोजणी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक तसेच सुक्ष्म निरिक्षक देखील नेमण्यात आले आहे. या सर्वांना प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मतमोजणी कक्षात उमेदवार, उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, स्मार्ट वॅाच, कॅल्क्युलेटर यासारखी ईलेक्ट्रॅानिक उपकरणे नेता येणार नाही. मतमोजणी केंद्राच्या सभोवती तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राज्य राखील पोलिस दल आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे.
सर्व ठिकाणी सकाळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रे असलेली स्ट्रॅांगरुम उघडण्यात येतील. याबाबत सर्व उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत सूचना देण्यात आल्या आहे. सकाळी बरोबर ८ वाजता टपाली मतपत्रिका मोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर ईलेक्ट्रॅानिक व्होटींग मशिनच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या सभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिाकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
सात मतमोजणी केंद्रांची ठिकाणे
जिल्ह्यात त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. शासकीय धान्य गोदाम वणी, कृषि उत्पन्न बाजार समिती गोदाम राळेगाव, शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ, धान्य गोदाम दारव्हा (दिग्रस मतदारसंघ), कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह पांढरकवडा (आर्णी मतदारसंघ), तालुका क्रीडा संकुल पुसद, कृषि उत्पन्न बाजार समिती गोदाम उमरखेड या ठिकाणी मजमोजणीची प्रक्रिया पार पडेल.