Published on
:
29 Nov 2024, 2:29 am
Updated on
:
29 Nov 2024, 2:29 am
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीला जिल्ह्यात अर्धे अर्धे बळ मिळाले; तर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच्या सर्व जागा या महायुतीला मिळाल्या. महाडिक यांच्या विजयी मिरवणुकीत ‘आता गोकुळमध्ये बदल’ असा फलक फडकविण्यात आला होता. गोकुळमध्ये सत्तांतर घडवायचे झाल्यास 2 संचालकांची व्यवस्था करावी लागणार, अशी आकडेमोडही झाली. पण महायुतीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी मात्र गोकुळमध्ये सध्या कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केल्याने युती आघाडी कागदावर व गोकुळ, केडीसी नेत्यांच्या अजेंड्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात गोकुळ व केडीसीसी बँक हे दोन बलाढ्य आर्थिक गड आहेत. केवळ आर्थिक गड नाही तर याच दोन संस्थांमधून जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या नेते आपल्या हातात ठेवत असतात. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातील माणसांशी जोडले जाण्याचे गोकुळ व केडीसीसी बँक हे एकमेव माध्यम आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा अशा देशाच्या व राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जनतेने पाठविल्यानंतरही पालकमंत्री, खासदार व आमदारांना जिल्हा बँकेचा मोह सुटत नाही तो यामुळेच. सर्वोच्च सभागृहात गेल्यानंतरही नाना खटपटी लटपटी करून खासदार, आमदार जिल्हा बँकेचे संचालकपद आपल्याकडेच ठेवतात. तेथे आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे त्यांना बिलकुल वाटत नाही.
जिल्ह्यात याच दोन संस्थांच्या माध्यमातून आर्थिक कारभारावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे पक्षनेते यापेक्षाही गोकुळ व केडीसीसी बँक प्रिय अशी नेत्यांची अवस्था आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील दहाही जागांवर महायुतीला यश मिळाले. त्यामुळे राजकीय बदलापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या व महाडिक यांच्या हातातून निसटलेल्या गोकुळवर महाडिक यांची पुन्हा नजर आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत खासदार धनंजय महाडिक यांनी आता गोकुळमध्ये बदल अशी घोषणा केली. अमल महाडिक यांच्या विजयी मिरवणुकीतही तसे फलक फडकविण्यात आले. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे गोकुळची सूत्रे काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांच्या ताब्यात असूनही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारात राहिले आहेत. त्यामुळे बदलाची सुरुवात झाली आहे.
मात्र हसन मुश्रीफ यांनी बदललेल्या राजकीय परिस्थितीचा तूर्त गोकुळ व केडीसीसी बँकेवर परिणाम होण्याची शक्तया फेटाळून लावली आहे. सध्या तरी असा बदल नाही. मात्र या दोन्ही संस्थांच्या निवडणुकीत असा बदल होऊ शकतो, असे म्हटले आहे. त्यामुळे गोकुळ व केडीसीसीत पक्ष बाजूला ठेवत सहकाराला प्राधान्य असल्याचे मुश्रीफ यांनी दाखवून दिले आहे.
अरुण डोंगळे राजीनामा देणार की, महायुतीच्या नेत्यांचा आदेश पाळणार
गोकुळमध्ये सत्तांतर घडविण्यात मोठा वाटा उचललेले विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना प्रत्येकी दोन वर्षे अध्यक्ष करण्याचा शब्द नेत्यांनी दिला होता. त्यानुसार विश्वास पाटील यांच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर आता अरुण डोंगळे यांच्याकडे अध्यक्षपद आहे. त्यांना नेत्यांनी दिलेला दोन वर्षांचा कालावधी पुढील वर्षी मेमध्ये संपणार आहे. त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला तरच पद रिक्त होऊ शकते. अरुण डोंगळे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात घेतलेली आघाडी पाहता ते राजीनामा देणार का? की त्यांना या निवडणुकीत महायुतीच्या प्रचारात ज्या बड्या नेत्याने गुंतविले, त्यांच्या इशार्यावर ते पुढील वाटचाल करणार, याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाची पुढील सूत्रे कोणाकडे हे ठरविण्यात गोकुळचा कासरा हाती ठेवलेल्या नेत्यांचा कस लागणार आहे.
जिल्हा बँकेत भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य आघाडीच्या सत्तारूढ संचालकांनी 21 पैकी 18 जागांवर विजय मिळविला होता. नव्या राजकीय समीकरणात जे तीन संचालक विरोधात निवडून आले, त्यांचे नेतेे महायुतीचे घटक झाले आहेत. त्यामुळे तेथे बदलाची शक्यता नाही.
असे आहे गोकुळचे सत्ता समीकरण
गोकुळमध्ये सत्तारूढ पक्षाचा धुव्वा उडवून सत्तांतर घडवून आणले. यामध्ये सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. आता गोकुळमध्ये सत्तांतर घडवायचे असेल तर 11 संचालकांची गरज लागेल. 21 पैकी 17 जागांवर पाटील-मुश्रीफ पॅनेलचे तर 4 जागांवर विरोधी आघाडीचे संचालक निवडून आले होते. नव्या राजकीय जुळणीत जे नेतेमहायुतीशी संबंधित आहेत, त्यांच्या संचालकांची संख्या 9 होते.