Published on
:
23 Nov 2024, 10:15 am
Updated on
:
23 Nov 2024, 10:15 am
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा विजय झाला आहे. ते 41 हजार 473 मतांनी विजयी झाले आहेत. तब्बल पाच वेळा विधानसभेत जाण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
रत्नागिरी विधानसभेच्या मतमोजणीस कुवारबांव येथील सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 8 वाजता सुरूवात झाली. अगदी पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी आघाडी मिळवली. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी आघाडी कमी होवू दिली नाही. महाविकास आघाडीचे बाळ माने यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. उदय सामंत यांना 1 लाख 10 हजार 327 तर बाळ माने यांना 68 हजार 854 मते मिळाली. तर नोटाला 3 हजार 19 मते मिळाली.
या मतदारसंघात तब्बल पाचव्यांदा आमदार उदय सामंत यांनी विजय मिळवला आहे. 2004 पासून ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. उदय सामत यांनी पहिल्या फेरीत 3 हजाराचं लिड घेतले होते. हीच लिड कायम राखत शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवले.
उदय सामंत मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार...
सलग पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे उदय सामंत हे मंत्रीपदासाठी दावेदार ठरणार आहेत. शिंदे गटाचे ते प्रमुख नेते आहेत. यापूर्वी ते उद्योगमंत्री होते. या काळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते सलग पाचव्यांदा विजयी झाले.