राक्षसी बहुमत मिळूनही महाराष्ट्रात आनंद का नाही?:राजभवनाऐवजी शेतात जाण्याची वेळ, ठाकरेंची शिंदेंवर टीका; आढावांनी उपोषण सोडले
3 hours ago
1
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. राक्षसी बहुमत मिळूनही महाराष्ट्रात आनंद का साजरा होत नाही? बहुमत मिळूनही या लोकांवर शपथ घेण्यासाठी राजभवनात जाण्याऐवजी शेतात जाऊन पूजाअर्चा करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणालेत. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी गत 3 दिवसांपासून पुण्यात विधानसभा निवडणुकीतील कथित गैरव्यवहाराप्रकरणी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण त्यांनी शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोडले. यावेळी त्यांनी उपोषण सुटले असले तरी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. हे लोक अमावस्येला पूजा करण्यासाठी शेतात गेले बाबा आढाव हे प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व आहे. ही प्रेरणा केव्हाच म्हातारी होऊ शकत नाही. वणवा पेटवण्यास एक ठिणगी पुरेशी असते. बाबा आढाव यांचे हे आंदोलन ती ठिणगी आहे. राज्यात महायुतीला राक्षसी बहुमत मिळाले. पण महाराष्ट्रात कुठेही त्याचा आनंदोत्सव नाही. हरलेल्यांना व जिंकलेल्यांनाही या निकालावर विश्वास नाही. स्पष्ट बहुमत मिळूनही हे लोक राजभवनात जाण्याऐवजी शेतात पूजाअर्चा करण्यासाठी जात आहेत. हे लोक अमावस्येला पूजा करण्यासाठी गेले, यावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असे उद्धव ठाकरे यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हणाले. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळगावी गेले आहेत. तिथे ते आजारी पडलेत. त्यामुळे मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनाक्रमामुळे राज्यातील सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे शिंदे यांच्या या अचानक ठरलेल्या सातारा दौऱ्यावर बोलत होते. आढावांचा आत्मक्लेश संपूर्ण महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, सत्ताधारी योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र विकत घेतला. या घोळात ईव्हीएमचा मोठा विषय आहे. शेवटच्या एका तासात 76 लाख मते कशी वाढली? याचे उत्तर मिळणे फार महत्त्वाचे आहे. आपला महाराष्ट्र लेचापेचा नाही. हे राज्य देशाला दिशा देईल. महाविकास आघाडीतील घटकपक्ष बाबा आढाव यांचे हे आंदोलन पुढे नेतील. यापुढे महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी अशी आंदोलने होतील. हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे. बाबा आढाव यांनी आता आत्मक्लेश करू नये. हा आत्मक्लेश आता संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. या सरकारचे अद्याप काहीच ठरले नाही आम्ही व आमच्या मित्रपक्षांनी आतापर्यंत एकमेकांविरोधात निवडणूक लढली. पण आमची महाविकास आघाडी अस्तित्वात आली की राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. आता विधानसभेची मुदत संपूनही राष्ट्र्पती राजवट लागली नाही. या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही. एवढे बहुमत मिळूनही हे लोक राजभवनाऐवजी शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार? याची कोणतीच तयारी नाही. हे असे का होत आहे कुणालाच ठावूक नाही. दरम्यान, आज दिवसभरात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)