Published on
:
23 Nov 2024, 12:02 pm
Updated on
:
23 Nov 2024, 12:02 pm
गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी-भुदरगड मतदारसंघात (Radhanagari Assembly Election Result) शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीत महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर १ लाख ४४ हजार ३५९ इतकी उच्चांकी मते मिळवून विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार के. पी. पाटील यांना १ लाख ६ हजार १०० मते तर अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील याना १९ हजार ११७ इतकी मते मिळाली. आबिटकर यांना ३८ हजार २५९ इतके मताधिक्य मिळाले. येथील मौनी विद्यापीठातील क्रिडा संकुलात मतमोजणी झाली.
महायुतीकडून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून के. पी. पाटील, बहुजन समाज पार्टीकडून पांडुरंग कांबळे, मनसेकडून युवराज यडुरे यांच्यासह अपक्ष ए.वाय. पाटील, कुदरतुल्ला लतीफ आणि के. पी. पाटील निवडणूक रिंगणात उतरले होते. निवडणूक रिंगणात सात उमेदवार उतरले असले तरी खरी लढत प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील यांच्यातच झाली.
यापूर्वी के. पी. पाटील हे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून आले होते. २०१४ आणि २०१९ साली शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर येथून निवडून आले आहेत. आता सलग तिसऱ्यांदा आबिटकटर येथून निवडून आले आहेत.
महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोनवेळा महाविकास आघाडीचे के. पी. पाटील यांचा पराभव केला होता. आता तिसऱ्यांदा त्यांनी के. पी. पाटील यांना धक्का दिला आहे. येथे अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील यांच्यामुळे चुरस निर्माण झाली होती. पण अखेर आबिटकरांनी बाजी मारली.
तिसऱ्यांदा आबिटकरांनी मारली बाजी
२०१४ मध्ये के. पी. पाटील यांच्या विजयाची हॅट्ट्रिक त्यांचेच शिष्य प्रकाश आबिटकर यांनी रोखली होती. आबिटकर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर राष्ट्रवादीच्या के. पी. पाटील यांचा तब्बल ३९ हजार ४०८ मतांनी पराभव केला होता. तर २०१९ मध्ये पुन्हा शिवसेनेतून उमेदवारी घेत आबिटकर यांनी के. पी. पाटील यांचा १८ हजार ४३० मतांनी पराभव केला होती.