विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकारांसमोर तिजोरीच (सेफ) आणली. एक है तो सेफ हैच्या घोषणा देणाऱया भाजपवर त्यांनी तिजोरी बॉम्ब पह्डला. या तिजोरीतून मोदी-अदानींचा फोटो आणि धारावीचा नकाशा बाहेर काढत त्यांनी पत्रकारांनाच धक्का दिला. अदानी, मोदी देश लुटण्यासाठी एक है तो सेफ है अशी घोषणा देत असल्याचा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यापूर्वी मुंबईत राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एक बंद तिजोरी (सेफ) पत्रकारांसमोर उघडली. त्यात मोदी आणि अदानींचा पह्टो आणि धारावीचा नकाशा ठेवण्यात आला होता. अदानी-मोदी देश लुटण्यासाठी ‘एक है तो सेफ है’ असा आरोप ही तिजोरी दाखवत राहुल गांधी यांनी केला. एक है तो सेफ है म्हणजे देशात फक्त अदानी व मोदी ‘एक है आणि सेफ है असे सांगत त्यांनी तिजोरी उघडून मोदी-अदानींची दोन पोस्टर्स बाहेर काढली. पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्याने धारावीची एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा दिमतीला असल्याचा आरोप त्यांनी केला.
धारावीच्या मुद्दय़ावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, धारावी ही लघु व मध्यम उद्योगाचे हब आहे. हे बंद करुन धारावी अदानीच्या घशात घालण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. हा फक्त धारावीच्या जमिनीपुरताच मुद्दा नसून मुंबई, मुंबईचे पर्यावरण यांच्याशीही संबंधित आहे. देशातील सर्व विमानतळ, संरक्षण साहित्य बनवण्याचे काम, बंदरे, ऊर्जा निर्मीती प्रकल्प सर्वकाही एकाच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी भाजपा सरकार काम करत आहे. भाजपाची नजर मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे होणे शक्य नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धारावीकरांच्या इच्छा अपेक्षानुसार त्यांचे हित जोपासत हा प्रकल्प राबविला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.
शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा
महाविकास आघाडीचे सरकार आल्यास धारावी पुनर्विकासाचे अदानीला दिलेले कंत्राट रद्द करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याबाबत राहुल गांधी यांनी त्यांची भूमिकां मांडली. आमचे जे सरकार येईल, ते महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे रक्षण करणारे असेल. धारावीत जो काही प्रकार सुरू आहे, तो महाराष्ट्राच्या, मुंबईच्या आणि धारावी जनतेच्या विरोधात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरें यांच्या सोबत असून त्यांच्या भूमिकेला समर्थन असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी जाहीर केले.
महाराष्ट्रातील 5 लाख नोकऱया राज्याबाहेर गेल्या
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या प्रकल्पांची राहुल गांधी यांनी यादीच वाचून दाखविली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. सोयाबीन, कापूस, कांदा यासह शेतमालाला भाव नाही तर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. परंतु भाजपा सरकार नोकर भरती करत नाही. उलट महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग प्रकल्प, आंतरराष्ट्रीय वित्तीय पेंद्र यासारखे तब्बल 7 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले असून यामुळे 5 लाख रोजगारही राज्याबाहेर गेल्याची टीका त्यांनी केली.