प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन यांचे पती आणि अभिनेत्री रिया, रायमा सेन यांचे वडील भारत देव वर्मा यांचं कोलकातामध्ये निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. भारत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील होते. त्यांची आई ईला देवी या कूच बेहारच्या राजकुमारी होत्या.
भारत देव वर्मा आणि त्यांचं कुटुंबImage Credit source: Instagram
अभिनेत्री मुनमुन सेन यांचा पती भारत देव वर्मा यांचं मंगळवारी (19 नोव्हेंबर) निधन झालं. कोलकातामध्ये सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार भारत देव यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलावली होती. मात्र ॲम्ब्युलन्स त्यांच्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी त्यांनी आपले प्राण सोडले. भारत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील होते. त्यांची आई ईला देवी या कूच बेहारच्या राजकुमारी होत्या. तर मोठी बहीण गायत्री देवी या जयपूरच्या महाराणी होत्या. भारत यांची आजी इंदिरा या वडोदराचे महाराज सर्जीराव गायकवाड तिसरे यांच्या एकुलत्या कन्या होत्या. भारत यांनी अभिनेत्री मुनमुन सेन यांच्याशी लग्न केलं. त्यांना रायमा आणि रिया या दोघी मुलगी असून दोघीही अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत.
मुनमुन सेन यांनी लग्न आणि आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. 1984 मध्ये ‘अंदर बाहर’ टा चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी विविध भाषांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. यात ‘100 डेज’, ‘सिरीवेन्नेला’ यांचा समावेश आहे. मुनमुन सेन यांनी त्यांच्या करिअरमध्ये 60 हून अधिक चित्रपट आणि 40 हून अधिक टेलिव्हिजन शोजमध्ये काम केलंय. भारत देव आणि मुनमुन यांची मुलगी रिया सेनने हिंदी, बंगाली, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘विशकन्या’मध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. तर ‘स्टाइल’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. रियाने ‘झंकार बीट्स’, ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.