Published on
:
19 Nov 2024, 3:21 pm
Updated on
:
19 Nov 2024, 3:21 pm
नवी दिल्ली : रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने तयारी केली आहे. त्यामुळे लोकांना जनरल डब्यांमध्ये गर्दीचा त्रास होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे आता जनरल बोगींची संख्या वाढवणार आहे. रेल्वे मंत्रालयाने जनरल डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर महिन्यात सुमारे ३७० नियमित गाड्यांमध्ये एक हजाराहून अधिक जनरल डबे जोडले जातील. एका अंदाजानुसार, रेल्वेचे नवीन जनरल डबे जोडले गेल्याने दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना फायदा होईल. रेल्वेने जनरल डबे बसवण्याचे काम सुरू केले आहे. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले की, नवीन जनरल वर्गाचे डब्बे दोन कारखान्यांमध्ये बनवले जात आहेत. चेन्नई इंटीग्रल कोच फॅक्टरी आणि रायबरेली कोच फॅक्टरीमध्ये कोच निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या दोन वर्षात १० हजार जनरल डब्बे बनवण्याची योजना असून त्याद्वारे सामान्य वर्गातील सुमारे आठ लाख अतिरिक्त प्रवासी दररोज प्रवास करू शकतील. हे सर्व डब्बे पूर्वीपेक्षा अधिक सोयीचे असतील. जवळपास सर्वच गाड्यांमध्ये चार जनरल डबे बसवण्याची योजना आहे. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वसाधारण श्रेणीतील एकूण ५८३ नवीन डब्बे तयार करण्यात आले आहेत. २२९ नियमित गाड्यांमध्ये हे डब्बे जोडण्यात आले आहेत.