रोहिणी खडसे यांचा गंभीर आरोप:म्हणाल्या - निकालापूर्वीच विरोधी उमेदवाराने मतांचा आकडा सांगितला, 5-10 मते सोडली तर तो खराही ठरला
4 hours ago
1
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनीही ईव्हीएम अर्थात मतदान यंत्रावर संशय व्यक्त केला आहे. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने निवडणुकीपूर्वीच आपण अमूक मतांनी निवडून येण्याची गॅरंटी दिली होती. त्यानंतर प्रत्यक्ष निकालात 5-10 मते सोडली तर तेवढीच मते पडली, असे त्या म्हणाल्यात. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर राज्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यात आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या मुक्ताईनगरच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचीही भर पडली आहे. रोहिणी खडसे यांनी शनिवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत आपल्या मतदार संघातील अनेक मतदान केंद्रावर संशयास्पद निकाल लागल्याचा आरोप केला. निकालापूर्वी सांगितलेल्या अंदाजानुसार मते पडली त्या म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मुक्ताईनगरमध्ये सोशल मीडियावर एक यादी व्हायरल झाली होती. या यादीत माझ्या प्रतिस्पर्धी उमदेवाराने आपण अमूक एवढ्या मतांनी विजयी होणार असल्याची गॅरंटी व्यक्त केली होती. कहर म्हणजे त्या यादीतील आकडे व निकाल लागल्यानंतर विशिष्ट मतदान केंद्रांवरील मतदान तंतोतंत जुळले. हे कसे शक्य आहे? 5-10 मते सोडली तर त्या यादीतील अंदाजानुसार अचूक निकाल लागला. 2 दिवसांनी लागणाऱ्या निकालाच्या आकडे एवढ्या अचूकपणे सांगणारा एकही ज्योतिषी अद्याप जन्माला आला नाही. त्यामुळे हे सर्वकाही अत्यंत संशयास्पद आहे. रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काही गावांत आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मते मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती. पण तिथेही त्यांना जास्त मते मिळाली. मागील 30 वर्षांपासून काही गावांत माझे वडील व मला केव्हाही कमी मतदान झाले नाही. त्या गावांतही आम्हाला कमी मतदान झाले. हे शक्यच नाही. कोणतीही लाट आली किंवा एखादी लोकप्रिय योजना आली म्हणून जवळचे मतदार एवढ्या लवकर नाते तोडत नाहीत. त्यामुळे हा लोकांचा नव्हे तर ईव्हीएमने दिलेला कौल आहे. रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी मुक्ताईनगरच्या 16 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी त्यांनी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला असून, अनामत रक्कमही जमा केली आहे. मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी रोहिणी खडसे म्हणाल्या, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रानेही निवडणुकीत ईव्हीएमचा वापर टाळला आहे. तिथे मतपत्रिकेवर मतदान होते. मग आपल्याकडेच ईव्हीएम का वापरले जात आहे? सत्ताधाऱ्यांनी काहीही चुकीचे केले नसेल आणि त्यांना जनतेवर विश्वास असेल तर पुन्हा एकदा मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जावी. म्हणजे लोकांचा कुणावर विश्वास आहे हे स्पष्ट होईल. शिंदे गटाच्या चंद्रकांत पाटलांकडून झाला पराभव उल्लेखनीय बाब म्हणजे, रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून यंदा दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी ही जागा आपल्या कन्या रोहिणी यांच्यासाठी सोडला. पण त्यावेळी अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला. यंदाही त्यांना चंद्राकात पाटील (शिंदे गट) यांच्याकडूनच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. चंद्रकांत पाटील यांना 112318, तर रोहिणी खडसे यांना 88414 मते पडली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)