तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील विजयानंतर कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र परिसरात रोहित पाटील यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला.Pudhari File Photo
Published on
:
23 Nov 2024, 8:08 pm
Updated on
:
23 Nov 2024, 8:08 pm
तासगाव : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहित पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी महायुतीचे उमेदवार माजी खासदार संजय पाटील यांचा 27 हजार 644 मतांनी पराभव केला. विजयामुळे ‘तासगाव - कवठेमहांकाळ’ मतदारसंघात रोहित पाटीलच ‘दादा’ असल्याचे सिद्ध झाले. संजय पाटील यांना लोकसभेनंतर विधानसभेलाही मतदारांनी नाकारले. आर. आर. पाटील घराण्याविरोधात विजय मिळवण्याचे त्यांचे 35 वर्षांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.
तासगाव-कवठेमहांकाळची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. याठिकाणी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व आमदार सुमन पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील आमने - सामने आले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही घराण्यातील संघर्ष उफाळून आला. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी कोण बाजी मारणार, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. तासगाव तहसील कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. एकून 22 फेर्यांमध्ये मतमोजणी पार पडली. सुरुवातीस टपाली मतदान मोजण्यात आले. त्यानंतर इव्हीएम मतमोजणीस सुरुवात झाली. प्रत्यक्ष मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासून रोहित पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. माजी खासदार संजय पाटील यांचे चिंचणी हे गाव व भैरववाडी तसेच जुळेवाडी वगळता तासगाव तालुक्यातील इतर गावांमध्ये रोहित पाटील यांची आघाडी कायम राहिली. तासगाव तालुक्यातील आठवी फेरी सोडली तर जवळपास सर्वच फेर्यांमध्ये रोहित पाटील आघाडीवर राहिले.
येळावी, मणेराजुरी, कवठेएकंद, सावळज, कुमठे, सावर्डे, वायफळे यासह राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सर्वच गावांमध्ये संजय पाटील पिछाडीवर राहिले. होमग्राऊंडवर संजय पाटील यांना मतदारांनी झिडकारल्याने सुरुवातीपासून त्यांची वाटचाल पराभवाकडे होती. कवठेमहांकाळ येथे अजितराव घोरपडे यांनी संजय पाटील यांच्या हातात हात घालून काम केले. मात्र घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांचे ऐकले नसल्याचे दिसून आले. ‘एक मत, दोन आमदार’ ही घोषणा हवेत विरल्याचे दिसले. कवठेमहांकाळमधील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत गावांमध्ये संजय पाटील यांना आघाडी मिळाली. बहुतांशी गावांमध्ये रोहित पाटील यांनाच मतदारांनी पसंती दिल्याचे दिसून आले. रोहित पाटील यांना 1 लाख 28 हजार 403 मते मिळाली. तर संजय पाटील यांना 1 लाख 759 मते मिळाली. विजय निश्चित झाल्यानंतर रोहित पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. रोहित यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या भगिनी स्मिता पाटील याही मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. दुपारनंतर रोहित पाटील मतमोजणी केंद्रावर आले. त्यांच्यासोबत आमदार सुमन पाटील, स्मिता पाटील होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी रोहित पाटील यांना प्रमाणपत्र दिले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गावागावात जल्लोष सुरू होता.
दहशत मोडून काढणार : आ. रोहित पाटील
निकालानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पाटील म्हणाले, तासगाव-कवठेमंकाळ मतदारसंघात यापुढे गैरकृत्य व अवैध कारभार मी चालू देणार नाही. चालला तर त्यावर योग्य पद्धतीने आवाज उठवत कायद्याच्या माध्यमातून दहशत मोडून काढू. तसेच भविष्यात मतदार संघात विविध विकासकामे व एमआयडीसीसाठी चांगल्या कंपन्या कशा येतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. साडेतीन हजार बोगस मतदान टाकूनही तासगाव शहरातील मतदारांनी अडीच हजारांचे मताधिक्य मला दिले. सर्व विरोधक एकत्र येऊनही जनता माझ्यासोबत होती. आर. आर. पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत काम करत राहणार आहे.
जनतेचे विकासाला मत : सुमन पाटील
आमदार सुमन पाटील म्हणाल्या, आर. आर. (आबा) पाटील आणि मी केलेल्या विकास कामांच्या बळावर रोहित पाटील यांना जनतेने भरभरून मतदान दिले. त्याबद्दल आम्ही या मतदारसंघातील जनतेचे ऋणी आहोत. विकासकामांचा वारसा आर. आर. आबांप्रमाणेच रोहित पुढे चालवून चांगले काम करेल, असा विश्वास आहे.
लोकांचा विश्वास रोहित सार्थकी लावेल : स्मिता पाटील
तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातील जनतेने आबा कुटुंबीयांवर कायम प्रेम केले आहे. रोहितच्या रूपाने या मतदारसंघाने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास टाकला. आबांच्या पावलावर पाऊल टाकतच रोहितही या मतदारसंघाचा चांगला विकास करेल व आमच्या कुटुंबावर दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवेल, अशी प्रतिक्रिया स्मिता पाटील यांनी दिली.
खचून न जाता काम करत राहणार : संजय पाटील
निवडणुकीतील पराभवानंतर बोलताना संजय पाटील म्हणाले, जनतेने दिलेला कौल मान्य करून विकासाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. परंतू राजकारण पुन्हा भावनेवर गेले, याबाबत हरकत नाही. राज्यात प्रचंड मोठ्या शक्तीने महायुतीचे सरकार आले आहे. राज्यात आणि केंद्रात सरकार आहे. आपल्याला विकासाचे राजकारण सुरू ठेवायचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेऊन कार्यकर्त्यांनी कुठेही अनुचित प्रकार करू नयेत. पराभवाने खचून न जाता विकासाचे राजकारण सुरू करूया.