कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर। तया नमस्कार वारंवार ॥
न पाही याती कुळाचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई॥
भलतीया भावे शरण जाता भेटी । पाडीतसें तुटी जन्मव्याधी ॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनी पाय वंदितसे ॥
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि. 27) माउलींची भव्य लाकडी रथातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या रथोत्सवाने अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाली होती. रथात विराजमान माउलींच्या मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रथाच्या दोन्ही बाजूस गर्दी केली होती.
माउलींचा रथोत्सव हा वैभवी आणि प्राचीन असलेल्या 150 वर्षे जुन्या लाकडी रथातून काढण्यात आला. तब्बल 23 फूट उंच आणि अंदाजे 1 हजार 200 किलो वजन असलेल्या या रथातून माउलींचा आळंदी शहरातून रथोत्सव पार पडला. या वेळी रथाचा दिमाखदारपणा नजरेत भरत होता. प्राचीन आणि सुबक रेखीव रथ विद्युत रोषणाईमुळे अधिकच उजळून निघाला होता.
माउलींच्या पालखी टाळ-मृदंगांच्या गजरात साडेचारच्या दरम्यान मुख्य महाद्वारातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. पावणेपाच वाजता पालखी गोपाळपुरा येथील श्री कृष्ण मंदिरात दाखल झाली. मंदिरात विसावल्यानंतर सव्वापाच वाजता पालखीतील माउलींच्या चांदीच्या मुखवट्याला लाकडी रथावर विराजमान करण्यात आले. तद्नंतर आरती होऊन पालखी टाळ-मृदंगांच्या गजरात साडेपाच वाजता मार्गस्थ झाली. या वेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमाजी नरके, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, मंगेश आरु, मच्छिंद्र शेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मानाच्या दिंड्यांमधील वारकरी पालखी पुढे चालत होते. गोपाळपुरा रस्त्यावरून पालखी वडगाव चौकात आली असता दिंडीतील वारकर्यांनी फेर धरत टाळ-मृदंगाचा गजर केला. रथासमोर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. माउलींचा रथ सायंकाळी उशिरा मंदिरात परतला.
...अन् रथ पुन्हा आळंदीच्या रस्त्यांवर धावला
इ.स. 1873 मध्ये श्री गुरू नरसिंह सरस्वतीस्वामी महाराज आळंदीला आले. इ.स.1886 ला त्यांनी आळंदीत समाधी घेतली. आपल्या आळंदीतील कार्यकाळात त्यांनी माउलींच्या वैभवात भर टाकण्यात मोठे योगदान दिले. माउलींच्या कार्तिकी उत्सवात रथोत्सव त्यांनी सुरू केला. त्यासाठी सुरेख नक्षीकाम असलेला शिसम लाकडाचा भव्य रथ त्यांनी माउलींसाठी बनविला. त्यातून पुढील काही दशके रथोत्सव या रथातून सुरू होता; मात्र तत्कालीन रस्त्यांची अवस्था आणि रथाची भव्यता पाहता पुढे देवस्थानने तो रथ स्थानबद्ध करत संवर्धित केला. यंदा मात्र पुन्हा रथाची डागडुजी करून हा रथ वापरण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आणि अनेक वर्षांनंतर माउलींचा रथोत्सव पुन्हा मूळ रथात दिमाखात पार पडला.