अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. अभिनयक्षेत्रात काम केल्यानंतर ट्विंकल लिखाणाकडे वळली आणि विविध लेखांच्या माध्यमातून ती तिची मतं मोकळेपणे मांडते. काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात चोराने चाकूहल्ला केला. त्यानंतर सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरवर काहींनी टीका केली. सैफवर हल्ला होत असताना करीना पार्टी करण्यात व्यस्त होती, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले. यावरून आता ट्विंकलने एक लेख लिहिला आहे. पुरुषाच्या प्रत्येक गोष्टीसाठी कशा पद्धतीने त्यांच्या पत्नींना जबाबदार ठरवलं जातं, याची काही उत्तम उदाहरणं तिने या लेखात दिली. त्याचसोबत उठसूठ पत्नींना दोष देणाऱ्यांना तिने उपरोधिकपणे टोला लगावला आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या या लेखात ट्विंकलने लिहिलं, ‘रात्री झोपण्यापूर्वी मी खिडक्या आणि दारं नीट बंद केली आहेत का, ते तपासून पाहिलं. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रत्येक घरातील लोकं ही काळजी घेत आहेत. जेव्हा सैफ रुग्णालयातत होता, तेव्हा अत्यंत फालतू अफवा पसरली होती की त्याची पत्नी त्यावेळी घरात नव्हती किंवा ती मद्यपान करण्यात व्यस्त होती, म्हणून त्याची मदत करू शकली नव्हती. लोकांना पत्नीला दोष देणं खूप आवडतं’
हे सुद्धा वाचा
‘जेव्हा बीटल्स (बँड) वेगळे झाले, तेव्हा जॉन लेननची पत्नी योको ओनोला लोकांनी दोष दिला. मेलानिया यांच्यावरही अनेकदा मौन बाळगल्याबद्दल किंवा पतीच्या धोरणांना सार्वजनिकरित्या मोजकं विरोध केल्याबद्दल टीका केली जाते. आरोग्याच्या समस्या असतानाही जो बायडेन यांना प्रचार सुरू ठेवण्यासाठी दबाव आणल्याबद्दल जिल बायडेन यांना जबाबदार ठरवण्यात आलं होतं. जेव्हा विराट कोहली बाद होतो, तेव्हा अनुष्का शर्मावर टीका केली जाते. जेव्हा बेकहॅम फुटबॉलच्या मैदानावर झुकू शकत नव्हता, तेव्हा व्हिक्टोरियाकडे बोटं दाखवण्यात आली’, असं तिने पुढे लिहिलंय.
केवळ सेलिब्रिटींच्या बाबतीतच नाही तर सर्वसामान्यांनाही अशा टीकेचा सामना करावा लागत असल्याचं ट्विंकलने म्हटलंय. हे पटवून देण्यासाठी तिने काही उदाहरणंसुद्धा दिली आहेत. ‘जर तुमच्या पतीचं वजन खूप वाढलं तर तुम्ही त्याच्या आरोग्याची काळजी नीट घेत नाहीत. जर त्याचं वजन काही किलोंनी कमी झालं, तर तुम्ही त्याला पुरेसं जेवण देत नाहीत. जर तुमचं घर अस्वच्छ असेल, तर तुम्ही आळशी आहात. जर ते खूप स्वच्छ असेल तर तुम्ही सतत नियंत्रणात गोष्टी ठेवणाऱ्या आहात. जर तुम्ही काम केलं, तर तुम्ही खूपच महत्त्वाकांक्षी आहात. जर तुम्ही नाही केलंत, तर तुम्ही कशाच्याच लायक नाहीत. जर पती तुमची काळजी अधिक घेत असेल तर तुम्ही त्याला आपल्या जाळ्यात ओढला असाल. जर तो तसा नसेल तर तुम्ही तुमच्या नात्याला योग्य पद्धतीने हाताळात नाही आहात’, अशी अनेक उदाहरणं ट्विंकलने या लेखात दिली आहेत.
या विषयाच्या संदर्भात मला असं म्हणणं योग्य वाटतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे, मग तो पराभूत असो किंवा नेता असो.. एक अशी स्त्री उभी असते जिची बदनामी होणारच असते, या वाक्याने तिने लेखाचा समारोप केला.