Published on
:
29 Nov 2024, 9:38 am
Updated on
:
29 Nov 2024, 9:38 am
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत. विदर्भाच्या दृष्टीने आनंदच आहे. विदर्भाचा बॅकलॉग दूर व्हावा, यासोबतच त्यांनी आता विकासाचे राजकारण करावे असा सल्ला माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड जवळपास निश्चित झाली असल्याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केले.
वडेट्टीवार म्हणाले, विदर्भाचा बॅकलॉग सात ते आठ वर्षात पूर्ण झाला नाही. आता तो पूर्ण होईल ही अपेक्षा आहे. मुळात त्यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या आहेत त्या फडणवीस यांच्यावरच अवलंबून आहेत. आता त्यांना फ्री हॅन्ड काम करण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचे लेकरू म्हणून विदर्भातला बॅकलाग, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न या सगळ्या पातळीवर विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया यावर वडेट्टीवार यांनी भर दिला.
देवेंद्रजींकडून दुसरी अपेक्षा आहे ती म्हणजे राजकारणात वैचारिक लढाई असावी, वैयक्तिक कोणी कोणाचेही वैरी नाहीत, त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते छाप पडतील अशी अपेक्षा आहे.
शिंदे उपमुख्यमंत्री बाबत...
अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला-नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेची सर्वोच्च खुर्ची मिळत नाही. त्यावेळी चेहरा पडलेलाच दिसेल असेही ते म्हणाले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे. त्यांना पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाने सत्तेत राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाहीत. ते विरोधही करणार नाहीत. दोन उपमुख्यमंत्री पूर्वीही होते. भाजपजवळ दुसरा पर्याय आहे. त्यामुळे मजबुरी आता आहेच. देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्रीपद घेतले होते याकडे लक्ष वेधले. यापूर्वी मुख्यमंत्री राहणाऱ्यांनी मंत्रीपदही घेतले आहे.
दरम्यान, पराभवानंतर बंटी शेळके- पटोले आरोप संदर्भात बोलताना बंटी शेळके युवक काँग्रेसचा लढवय्या नेता आहे. आरएसएस मुख्यालय असलेल्या भागात लढतो. बंटी शेळके यांचा आरोप मी ऐकला नाही, काय बोलले त्याची माहिती घेऊ आणि मला तरी वाटतं बंटी शेळकेचा उद्रेक का झाला, या संदर्भातही ही भाषा ते का वापरत आहेत या संदर्भात आम्ही हायकमांडच्या कानावर घालू असे सांगितले. मुळात वस्तूस्थिती आणि त्याची कारणे शोधली पाहिजेत, एखादी व्यक्ती निवडणूक लढतो आणि कमी अंतराने पडतो. त्यावेळेस काय ठेच लागली हे समजणे आवश्यक आहे. जय पराजय होतच असतो. राजकारणात संयम महत्त्वाचा आहे. आपण आज 16 आहोत त्याचे 60 कसे होतील त्या दृष्टीने काम करणे आवश्यक आहे.
नाना पटोले नाराजी विषयी ते म्हणाले, पक्षाचे तिकीट राहुल गांधी, खरगे आणि हाय कमांड देत असतात, राज्य नेतृत्वाला तिकीट देण्याचा अधिकार नाही. नाना पटोले हटाव अभियान संदर्भात बोलताना, त्यामध्ये आम्ही नाही, मी व्यक्तीशः कुठलीही मोहीम राबवण्याची आवश्यकता वाटत नाही. व्यक्ती आहेत चुका होतच असतात. एवढा मोठा पराजय राज्यात होतो आहे. त्याची गांभीर्याने कारने शोधून मंथन होण्याची आवश्यकता आहे. केवळ बैठका घेऊन काही निष्पन्न होणार नाही. कारणे शोधली पाहिजेत असा सबुरीचा सल्लाही त्यांनी काँग्रेसच्या पराभवावर दिला.