Published on
:
23 Nov 2024, 1:45 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:45 pm
वर्धाः वर्धा जिल्ह्यात चारही विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. वर्धा, हिंगणघाट येथे भाजप उमेदवारांनी हॅटट्रीक केली असून देवळीत प्रथमच भाजपचा झेंडा फडकला. आर्वीतही भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला. लोकसभेत महाविकास आघाडीला भरभरून मते दिली असली तरी विधानसभेत मात्र मतदारांनी महायुतीलाच पसंती दर्शविली.
वर्धा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार पंकज भोयर यांना सुरूवातीच्या फेर्यांमध्ये पिछाडी होती. येथे काँग्रेसचे शेखर शेंडे आघाडीवर होते. मात्र काही फेर्यांनंतर चित्र बदलत गेले. आमदार पंकज भोयर यांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम राहिली. सात हजारांवर मताधिक्क्याने आमदार पंकज भोयर विजयी झाल्याचे सांगण्यात आले.
देवळी विधानसभा मतदारसंघात मागील पाच वेळपासून काँग्रेसचे आमदार राहिलेले रणजित कांबळे यांचा पराभव झाला. रणजित कांबळे सहाव्यांदा काँग्रेसकडून रिंगणात होते. भाजपचे राजेश बकाणे यांनी कांबळे यांची हॅटट्रीक हुकविली. या मतदारसंघात प्रथमच कमळ फुलले. काँग्रेससाठी हा धक्कादायक पराभव ठरला. मागील निवडणुकीत जिल्ह्यात एकमेव काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे होते. यावेळी देवळीतही काँग्रेसचा पराभव झाला.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार समीर कुणावार यांनी हॅटट्रीक साधली. सलग तिसर्यांदा आमदार समीर कुणावार यांना मतदारांनी पसंती दिली. येथे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांचा पराभव झाला. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात प्रथमच हॅटट्रीक झाली असल्याचे बोलले जाते.
आर्वी विधानसभा मतदारसंघही लक्षवेधक होता. येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमीत वानखेडे विजयी झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक म्हणून ओळखले जाणारे सुमीत वानखेडे आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार अमर काळे यांच्या पत्नी निवडणुकीत उमेदवार होत्या. येथे खासदार अमर काळे यांच्या पत्नीचा पराभव झाला. आर्वीत आमदार दादाराव केचे यांना उमेदवारी न देता सुमीत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुमीत वानखेडे यांना येथे विजय मिळाला. विजयानंतर गुलाल उधळण्यात आला. रॅली काढत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पेढे भरवत, हार, फुलांनी उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
Meta Keywords: BJP victory Wardha, Wardha assembly constituencies, Mahavikas Aghadi defeat, BJP dominance Maharashtra, Wardha election results