आ. देवयानी फरांदेFILE
Published on
:
18 Nov 2024, 7:58 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:58 am
नाशिक : मध्य मतदारसंघाच्या विकासासाठी मी पाच वर्षांत अनेक महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेली. अनेक कामे मंजूर आहेत, तर काही कामे सध्या सुरू आहेत. माझे प्रतिस्पर्धी वसंत गिते यांनी त्यांच्या आमदारकी आणि महापौरपदाच्या कार्यकाळात कोणती कामे केली आहेत ? त्यांनी केलेले एक जरी मोठे काम दाखवले, तरी मी एक लाखाचे बक्षीस देईन, असे आव्हान मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत फरांदे यांनी जोरदार भाषण करीत विरोधकांवर हल्लाबोल केला. फरांदे म्हणाल्या की, मराठा, धनगर समाजासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह बांधले जात आहे. तसेच विविध समाजांचे २५ मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर केला आहे. मेळा बसस्थानकाचा विकास करतानाच सीबीएसचेही नूतनीकरण सुरू केले. त्यांनी महिला रुग्णालयाला विरोध केला.
मला कोर्टात खेचले. मात्र कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला. आज या रुग्णालयाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसर्या टप्प्याच्या कामासाठीही देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केला. वास्तविक गिते यापूर्वी आमदार होते, महापौर होते. त्यांचा मुलगाही उपमहापौर होता. या कार्यकाळात त्यांनी केलेले एक तरी मोठे काम दाखवा, मी एक लाखाचे बक्षीस देईन. आमदार असताना पाच वर्षांत विधानसभेत त्यांनी केलेले एक भाषण दाखवावे, मी एक लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देईन. त्यांनी शुद्ध मराठीतून चार ओळी बोलून दाखवल्या, तर मी 11 हजार रुपयांचे बक्षीस देईन. ड्रगमुक्त नाशिकसाठी मीच सर्वप्रथम सभागृहात आवाज उठवला, असेही फरांदे यांनी सांगितले.