मकरंद पाटील, अरूणादेवी पिसाळ, पुरषोत्तम जाधवPudhari File Photo
Published on
:
20 Nov 2024, 1:31 am
Updated on
:
20 Nov 2024, 1:31 am
वाई : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा खाली बसला असून आज मतदान होत आहे. वाई विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवार रिंगणात आहे. असे असले तरी महायुतीचे आ. मकरंद पाटील व महाविकास आघाडीच्या सौ. अरूणादेवी पिसाळ यांच्यातच लढाई होणार आहे. तर महायुतीचे बंडखोर उमेदवार पुरूषोत्तम जाधव यांनीही आपली हवा तयार केली आहे. वाईत झालेल्या शरद पवारांच्या सभेमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये कडवी टक्कर होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूकडील यंत्रणा अलर्ट झाली आहे.
वाई विधानसभा मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये मकरंद पाटील विरूध्द मदनदादा भोसले यांच्यातच लढत झाली. मात्र, यंदा राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये फाटाफूट झाल्याने सर्व राजकीय समीकरणे बदलली आहे. येथून अजित पवार गटाने आ. मकरंद पाटील यांना तर शरद पवार गटाने अंतिम क्षणी सौ. अरूणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर केली. तर पुरूषोत्तम जाधव यांनीही बंडखोरी करत आपली दावेदारी दाखल केली. यांच्यासह 13 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
गेल्या 15 दिवसांत अरूणादेवी पिसाळ व पुरूषोत्तम जाधव यांनी आ. मकरंद पाटील यांच्यावर आरोप केले. याला आ. मकरंद पाटील यांनीही प्रत्यारोप करत व विकासकामांचा पाढा वाचत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. अरूणादेवी यांनीही तिन्ही तालुक्यांमध्ये गावोगावी पदयात्रा काढल्या. त्यामुळे या मतदारसंघात कडवी लढत होणार आहे. आता मतदानासाठी कार्यकर्ते बाहेर काढून आपल्या गटाचे मतदान करून घेणे उमेदवारांसाठी महत्वाचे असणार आहे. त्यादृष्टीने मुख्य तिन्ही उमेदवारांसह इतर पक्षाच्या उमेदवारांकडून व अपक्षांकडून यंत्रणा लावण्यात आली आहे.