वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो आईने पाहिले : मुलीने घेतली उड्डाणपुलावरून उडीfile photo
Published on
:
27 Nov 2024, 8:27 am
Updated on
:
27 Nov 2024, 8:27 am
छत्रपती संभाजीनगर : मी उड्डाणपुलावरून उडी घेऊन जीवन संपवत आहे, असे म्हणत २१ वर्षीय मुलीने घरी फोन केला. त्यानंतर आई-वडील घाबरून तिला शोधत आले. वडिलांना पाहताच तिने थेट सेव्हनहिल उड्डाणपुलाच्या मध्यभागातून खाली उडी मारली. ही घटना मंगळवारी (दि.२६) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिचा पाय फॅक्चर झाला आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मित्राच्या वाढदिवसाला गेल्याचे फोटो मुलीच्या घरच्यांना मिळाल्यानंतर तिला आई वडिलांनी झापले होते. त्यानंतर मित्रानेही तिच्याशी बोलणे बंद केले. यामुळे नैराशेतून मुलीने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते.
अधिक माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी ही बी. फार्मसी महाविद्यालयामध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्या मित्राचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या पार्टीला नम्रता (नाव बदलले आहे.) गेली होती. त्या पार्टीचे फोटो इतर कोणत्या व्यक्तीकडून तिच्या आईला मिळाले. त्यावर आईने तिला जाब विचारत खडसावले. तसेच ज्या मुलाचा वाढदिवस होता त्यालाही विचारणा करून झापले. त्यावर नम्रताच्या मित्राने यानंतर असे होणार नाही, अशी ग्वाही देत नम्रताला बोलणे बंद केले होते.
दरम्यान, तिने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडिलांना फोन करून आता मी घरी येणार नाही. उड्डाणपुलावरून उडी घेत जीवन संपवत असल्याचा निरोप दिला. या फोननंतर आई-वडिलांनी दुचाकी काढून सिडकोसह इतर उड्डाणपुलांवर मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा सेव्हनहिल उड्डाणपुलावर एक दुचाकी व मुलगी थांबलेली पालकांना दिसली. तरुणीनेही वडील आल्याचे पाहिल्यानंतर थेट उड्डाणपुलावरून खाली उडी घेतली.
तरुणीने उडी घेतली तेव्हा पुलाखालील रस्त्यावरून वाहतूक नव्हती. सिंग्नल लागलेला होता. तरुणी थेट पायावर पडली. त्यामुळे तिचा पाय फॅक्चर झाला असून, तोंडालाही मार लागला आहे. खाली उभा असलेल्या रिक्षा चालकाने व एका दुचाकी चालकाने तिला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे व उपनिरीक्षक प्रशांत पासलकर घटनास्थळी दाखल झाले होते. तरुणीसह तिच्या वडिलांचा जबाबही नोंदवला आहे. या घटनेची नोंद जिन्सी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.