वार्तापत्र – फातर्पेकर राखणार चेंबूरचा गड

4 days ago 2

पूर्व उपनगरातील चेंबूर विधानसभा क्षेत्रात मराठी, सिंधी, दाक्षिणात्य, दलित, पंजाबी, उत्तर हिंदुस्थानी अशी संमिश्र वस्ती असून या मतदारसंघावर मागील एक दशकापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेत फूट पडल्यावरही येथील शिवसैनिक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. येथून शिवसेनेकडून प्रकाश फातर्पेकर हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून शिंदे गटाकडून तुकाराम काते येथून नशीब आजमावत आहेत. फातर्पेकर यांनी आमदार म्हणून मागील दहा वर्षांत केलेली विकासकामे आणि मतदारसंघात असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता चेंबूर विधानसभेचा गड या वेळीही कायम राखत ते विजयाची हॅट्ट्रिक करतील असे चित्र आहे.

महापालिकेत स्थायी, आरोग्य समितीत काम केलेल्या फातर्पेकर यांना कामाचा अनुभव आहे. त्यात स्थानिकांशी असलेला दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. या मतदारसंघातून या वेळी विधानसभा निवडणुकीत एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण खरी लढत शिंदे गटाचे तुकाराम काते आणि शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर यांच्यात होणार आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून परिचित असलेल्या फातर्पेकर यांच्यापुढे शिंदे गटाच्या काते यांचा टिकाव लागणे अवघड  आहे.

विकासाचा अजेंडा 

झामा चौक ते सुमन नगर येथील रस्त्याला हशू अडवाणी विद्यानगरी चौक नाव देणे, हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीच्या वेळी हिंदुस्थानात आलेल्या सिंधी बांधवांना समर्पित आशीष तलाव येथे सिंध ज्योत निर्माण करणे, चेंबूर येथील एसआरए प्रकल्प जलद गतीने सुरू होणे, रेल्वे लाईनजवळील झोपडय़ांचे सर्वेक्षण व त्यांना एसआरए प्रकल्पात सामावून घेणे, चेंबूरमधील प्रत्येक प्रभागात महिला भवन निर्माण करणे हा फातर्पेकर यांचा विकासाचा अजेंडा आहे.

z माहुल गाव येथे पर्यटनदृष्टय़ा मॅन्ग्रोस पार्कमध्ये फ्लेमिंगो पक्षी निरीक्षण गॅलरी तयार केली जाणार आहे. त्यासाठी फातर्पेकर यांनी पाठपुरावा केला आहे.

महाविकास आघाडी भक्कम

महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर यांना तुल्यबळ लढत देईल असा तगडा उमेदवार महायुतीकडे नाही. येथून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिंदे गटाचे तुकाराम काते चेंबूर विधानसभा लढण्यास तयार नव्हते. त्यांना अणुशक्ती नगर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, पण ही जागा महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाकडे गेल्याने काते यांना चेंबूर येथून लढणे भाग पडले. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आधीपासूनच आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी व आघाडीतील अन्य घटक पक्षांचे पाठबळ ही फातर्पेकर यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. लोकसभेच्या वेळी या मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार खासदार अनिल देसाई यांना भरघोस मतदान झाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article