विदर्भात भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 12:22 pm
Updated on
:
23 Nov 2024, 12:22 pm
नागपूर: विदर्भात शनिवारी लागलेल्या निकालाने कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भ आता पुरता भाजपच्या ताब्यात गेल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. 55 जागांवर भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती तर 7 जागी महाविकास आघाडी वृत्त लिहीपर्यंत आघाडीवर आहे. मोदी लाट, 2014 पेक्षाही मोठे यश भाजप महायुतीने मिळविले असून महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे.
भाजपला लाडक्या बहिणींची मोठी साथ भाजप साठी गेमचेंजर ठरली असून सावत्र भाऊ सत्तेत आल्यास या योजना बंद पडतील ! हे पोहोचविण्यात काँग्रेसच्या 3000 रुपये आम्ही देऊ, या आमिषापेक्षा भाजप यशस्वी ठरली. महागाई,शेतकऱ्यांची नाराजी, बेरोजगारी असे ज्वलंत विषय असूनही काँग्रेस एकसंघपणे याचा मुकाबला करू शकली नाही. या लाटेतही अनेक उमेदवारांनी शेवटच्या फेरीपर्यंत भाजपला कडवी झुंज दिली आहे. सत्ता स्थापनेसाठी विदर्भातील 62 जागांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. विदर्भातील आमदार घेऊन जाण्यासाठी नागपुरात विमान सज्ज होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरातून मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.
यावेळी विदर्भात मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजल्या जाणारे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र असे दिग्गज पराभूत झाले आहेत. एकीकडे काही जुने चेहरे दमदार कामगिरीतून तर अनेक नवे चेहरे धक्कादायक निकालाची नोंद करत विधानसभेत पोहोचले आहेत. विदर्भात रामटेक, काटोल, सावनेर, नागपूर दक्षिण, मध्य अशा काही अटीतटीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. पूर्व विदर्भात लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक या तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.
18 विधानसभा मतदारसंघात महायुतीला धोबीपछाड मिळाली. विदर्भात 48 जागी हे चित्र असताना विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने विशेषतः भाजपने विकासकामांवर भर देत मतदारसंघनिहाय संभाव्य मतविभाजन लक्षात घेता, सामाजिक समीकरण जुळवीत, संघ परिवाराची साथ मिळवित, विविध प्रांतातील नेत्यांना प्रचारात लावत जोरदार कमबॅक केले. त्या तुलनेत महाविकास आघाडीला महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न एकसंघपणे लावून धरण्यात फारसे यश मिळू शकले नाही हे वास्तव आहे.
महायुतीने आपले स्कोर कार्ड कसे चांगले राहील, यादृष्टीने आपले काही उमेदवार शिवसेना आणि अजित दादा गटात पाठवून आधीच विरोधकांना चेक दिला. विदर्भात 62 पैकी 36 मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट तर अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आणि रामटेकमध्ये दोन्ही शिवसेना परस्परांसमोर होत्या. येथे सांगली पॅटर्न यशस्वी होणार असे बोलले जात असताना शिंदे सेनेने बाजी मारली.
विदर्भात लोकसभेचा विचार करता महाविकास आघाडीला 7 तर भाजप शिवसेना महायुतीला तीन जागा मिळाल्या. 48 मतदार संघात महायुतीची पिछेहाट झाली होती. मात्र, लाडकी बहीण योजना भाजपसाठी विरोधकांना भुईसपाट करण्यात महत्वाची ठरली.