Published on
:
19 Nov 2024, 7:35 am
Updated on
:
19 Nov 2024, 7:35 am
विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, मतदान प्रक्रिया पारदर्शक वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. सर्वच मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्य व कर्मचार्यांची वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यात 791 मार्गावर 464 बस, 1 हजार 115 जीप, 125 मिनी बस, 125 क्रुझर, 41 कार्गो आणि 18 आयशर वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी 37 लाख 83 हजार 987 मतदार असून, मतदान प्रक्रिया 3 हजार 765 मतदान केंद्रांवर राबवली जाणार आहे. यासाठी 21 हजार 574 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यापैकी 17 हजार 169 जणांनी पोस्टल मतदानाव्दारे मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, 99 टक्के मतदारांना पोलिंग चिठठ्यांचे वाटप केल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विधानसभेसाठी बुधवारी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व सुविदा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांगा, गर्दी झाल्यास बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या, प्रतिक्षालय, पिण्याचे पाणी, स्वच्छातागृह, वैद्यकिय सुविधा, वयोवृध्द नागरिक आणि दिव्यांगासाठी व्हीलचेअर आदी विशेष सुविधा देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदी उपस्थित होते.
जिल्हा आचारसंहिता कक्षाकडे 33 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये खासगी संस्थांच्या कर्मचार्यांचा प्रचारात सहभागाबाबत 6, धार्मिक स्थळाचा वापर, भाषणातील वक्तव्याबाबत 6, पोलिस निरीक्षक कारवाई करत नसल्याबाबत 4 परवानगी न घेता वाहनांवर उमेदवारांचा फोटो अशा तीन तक्रारींचा समावेश आहे. यापैकी सात तक्रारीत मात्र तथ्या आढळून आल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे 23 तक्रारींमध्ये तथ्थ आढळून आले नाही. तीन तक्रारींबाबत चौकशी सुरु असल्याने प्रलंबित आहेत.
निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त
3765 बूथवर जिल्हा पोलिस दलाने तगडा बंदोबस्त नेमला आहे. सतीची वाडी (संगमनेर), तरकसवाडी (शिर्डी) हे बूथ संवेदनशील आहेत. पोलिस अधीक्षक, दोन अपर पोलिस अधीक्षक, 10 उपअधीक्षक, 36 पोलिस निरीक्षक, 173 सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, 3623 पोलिस कॉन्स्टेबल, 3623 होमगार्ड, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 11 तुकड्या, राज्य राखीव पोलिस दलाच्या 5 तुकड्या तैनात केल्या आहेत.
31.19 कोटींच्या वस्तू जप्त
आचारसंहिता कालावधीत विविध यंत्रणाकडून जिल्हाभरात 31 कोटी 19 लाख 26 हजार रुपये किंमतीचे वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पारनेर येथे पकडण्यात आलेल्या 23 कोटी 61 लाखांची मौल्यवान वस्तू, 3 कोटी 64 हजार रुपयांचे मद्य, 53 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ, 2 कोटी 11 लाखांच्या भेटवस्तू तसेच 1 कोटी 28 लाख 89 रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.