Published on
:
19 Nov 2024, 9:02 am
Updated on
:
19 Nov 2024, 9:02 am
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी परवानगी न घेता बॅनर व पोस्टर्सवर माझे छायाचित्र छापून त्यांचा वापर करून ते प्रचार करीत आहेत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विना परवानगी वापरलेले नाव व फोटोंचे पोस्टर्स व बॅनर्स काढावेत, अशा सूचना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना द्याव्या, अशा आशयाच्या तक्रारीचे पत्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिले आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांनी अर्ज भरला तर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संमती नसतानाही शिवसेना (एकनाथ शिंदे गटाकडून) उमेदवारी अर्ज भरल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र आमदार लहू कानडे यांच्या प्रचार शुभारंभ सभेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले, मात्र त्यानंतरही महायुतीचे उमेदवार असल्याचा संभ्रम निर्माण करून कांबळे प्रचार करीत आहेत. कांबळे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र मुख्यमंत्री सभेसाठी श्रीरामपुरात आले नाहीत. असे असताना कांबळेंकडून संभ्रम निर्माण करून, महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान त्यांच्या पोस्टर्स व बॅनर्सवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव व फोटो छापल्याने त्यांच्याविरोधात विखे यांनी आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे तक्रार केली आहे. प्रचारसभेसह कांबळे यांनी माझे फोटो प्रचार करताना वापरू नये, असे मंत्री विखे यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
‘श्रीरामपूर मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब मल्हारी कांबळे हे माझे नाव व फोटो त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणार्या पोस्टर्स बॅनरवर टाकून मतदार संघामध्ये प्रचार करीत आहेत. कांबळे यांनी यासाठी माझी तोंडी अथवा लेखी परवानगी घेतली नाही. मी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. विना परवानगी वापरलेले नाव व फोटोंसह पोस्टर्स व बॅनर्स तत्काळ काढावेत, अशी सूचना निवडणूक प्रशासनाने कांबळे यांना द्यावी.
राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री