विनोद तावडे हे निष्कलंक असून त्यांच्यावर झालेले आरोप चुकीचे असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.file photo
Published on
:
19 Nov 2024, 2:46 pm
Updated on
:
19 Nov 2024, 2:46 pm
नागपूर : भाजप नेते विनोद तावडे निष्कलंक आहेत. त्यांच्यावर आज जे आरोप झाले ते चुकीचे आहेत. तपास यंत्रणा याचा तपास करेल पण भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.१९) माध्यमांशी बोलताना दिली.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे नालासोपारा, वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसं काम करावं, मतदानाचा टक्का कसा वाढेल, बोगस मतदान कसे थांबवता येईल? याविषयी बैठक घेत असताना विरोधकांनी पैसे वाटल्याची खोटी माहिती पसरवली. विरोधकांचे हे पूर्वनियोजित षडयंत्र होते, असेही ते यावेळी म्हणाले.
विनोद तावडे हे कोट्यवधी रुपये घेऊन आले आहेत. ते पैसे वसई विरार आणि नालासोपारा भागात वाटणार आहेत, अशी विरोधकांनी एक फिल्म तयार केली. विनोद तावडे यांना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आले. विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि त्या पदावर असलेली व्यक्ती अशा प्रकारे पैसे वाटप करतील का ? याचा विचार केला पाहिजे. खरे तर विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. निवडणुकीत यश मिळणार नाही, अशी भीती असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि विनोद तावडे यांना बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.