Published on
:
19 Nov 2024, 2:50 pm
Updated on
:
19 Nov 2024, 2:50 pm
नवी दिल्ली: भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) सोशल मीडिया कंपनी मेटाला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. २०२१ मध्ये मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणात बदल करण्यात आला होता. त्याबदलांनुसार भारतीय वापरकर्त्यांना आपला डेटा अर्थात माहिती व्हॉट्सएपसोबत सामायिक करणे भाग पाडले होते. मात्र, हे योग्य नसल्याचे सीसीआयने म्हटले आहे आणि मेटा कंपनीला दंड ठोठावला. चुकीच्या व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे, असे सीसीआयने सांगितले. मेटाने स्पर्धाविरोधी वर्तन करु नये असे निर्देश सीसीआयने मेटाला दिले आहेत.
सीसीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मेटाने आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केला आहे. याशिवाय, हा दंड व्हॉट्सॲपचे २०२१ गोपनीयता धोरण कसे लागू केले गेले, वापरकर्त्याचा डेटा कसा संकलित केला गेला आणि तो मेटाच्या इतर कंपन्यांशी कसा शेअर केला गेला याच्याशी संबंधित आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने म्हटले आहे की व्हॉट्सॲप आपल्या प्लॅटफॉर्मवर संकलित केलेला भारतीय वापरकर्ता डेटा ५ वर्षांपर्यंत जाहिरातींसाठी इतर मेटा कंपन्यांसोबत शेअर करू शकत नाही.
सीसीआयला त्यांच्या तपासणीत असे आढळून आले की व्हॉट्सॲपचे 'टेक-इट-ऑर-लीव्ह-इट' धोरण अपडेट योग्य नव्हते. म्हणजेच, या धोरणामुळे सर्व व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना डेटा संकलनाच्या अटी स्वीकारण्यास आणि कोणत्याही निवड न करता मेटा गटामध्ये डेटा सामायिक करण्यास भाग पाडले. सीसीआयच्या तपासणीत असे आढळून आले की मेटा ने आणलेले हे धोरण, जे अपडेटच्या स्वरूपात होते, वापरकर्त्यांना ते लागू करण्यास भाग पाडते आणि त्यांची स्वायत्तता कमी करते.