शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी बनेश्वरला अभिषेकPudhari
Published on
:
29 Nov 2024, 8:03 am
Updated on
:
29 Nov 2024, 8:03 am
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दावा सोडला असल्याचे जाहीर केले; मात्र शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे, अशी मनोकामना करत भोर तालुक्यातील शिवसैनिकांनी बनेश्वराला साकडे घातले आहे.
नसरापूर (ता. भोर) येथील बनेश्वर मंदिरात मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची निवड व्हावी, यासाठी महादेवाला शिवसैनिकांच्या वतीने दुग्धअभिषेक करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे भोर तालुकाप्रमुख अमोल पांगारे, विभागप्रमुख मंगेश तनपुरे, राहुल पांगारे, चेतन पांगारे, राहुल मिसाळ, अमित गुरव, अजिंक्य पांगारे, प्रसन्न गयावळ, ऋषिकेश खवले आदी शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत खलबते सुरू असतानाच आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देवाला साकडे घालण्यात येत आहे.
राज्यपाल यांनी शिंदे यांचेवर नवे सरकार राज्यात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय आम्हाला मान्य आहेत; मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना राज्यातील जनतेच्या हिताचे काम केले आहे. त्यामुळे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याचे शिवसेनेचे भोर तालुकाप्रमुख अमोल पांगारे यांनी सांगितले.