शिराळ्यात भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (file photo)
Published on
:
23 Nov 2024, 10:49 am
Updated on
:
23 Nov 2024, 10:49 am
शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शिराळा मतदारसंघात (Shirala Assembly Election results) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख अशी दुरंगी लढत झाली. या लढतीत मानसिंगराव नाईक यांचा दारूण पराभव झाला. येथे सत्यजित देशमुख मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत.
शिराळा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीचे भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा २२ हजार ६८९ मतांनी पराभव केला. भाजप नेते सम्राट महाडिक हे प्रमुख विजयाचे शिल्पकार ठरले. वाळवा तालुक्यातील ४८ गावांतही भाजपला चांगली आघाडी मिळाली.
सकाळी आठ वाजता मतमोजणी गोरक्षनाथ आयटीआय येथे सुरू झाली. सुरुवातीपासून राजेंद्रसिंह नाईक, युवा नेते विराज नाईक मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी आघाडी घेतली होती. तर तिसऱ्या फेरीपासून अखेरपर्यंत सत्यजित देशमुख यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांनी गावागावात गुलालाची उधळण, फटाके उडवून आनंद साजरा केला.
ज्यावेळी मताधिक्यात वाढ होत होती; त्यावेळी उमेदवार सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक हे मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. विजयाची खात्री झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. यावेळी राहुल महाडिक, केदार नलवडे, हणमंतराव पाटील, पृथ्वीसिंह नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक , सागर खोत, दि. बा. पाटील, चंद्रकांत पाटील आदींनी अभिनंदन केले. विजयानंतर शिराळा मतमोजणी ठिकाणाहून भव्य रॅली काढण्यात आली.
लाडक्या बहिणीने आशिर्वाद दिला- सत्यजित देशमुख
या विजयानंतर सत्यजित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीने केलेल्या पथदर्शक कामाची पोहोचपावती मतदारांनी दिली आहे. विद्यमान आमदारांचा निष्क्रिय कारभार, हुकूमशाही, दडपशाहीस जनता कंटाळली आहे. सम्राट महाडिक, जयराज पाटील, राहुल महाडीक, पृथ्वीसिंह नाईक, रणजित नाईक, आमदार सदाभाऊ खोत, केदार नलवडे, राहुल महाडिक आदी कार्यकर्त्यांच्या एकीमुळे हा निर्णायक यश मिळवले आहे. यापुढेही एकसंघ पणे काम करू. जो विश्वास आमच्यावर जनतेने टाकला आहे. तो विश्वास आम्ही विकास कामातून पूर्ण करू. विकासाची गंगा खेचून आणणार आहोत. लाडक्या बहिणीने आशिर्वाद दिला, असे देशमुख म्हणाले.
सरकारी योजना राबविण्यात आल्या. आम्ही एकत्रित पणे काम केले. शिवसेनेने चांगले काम केले. विनय कोरे यांची मोठी मदत झाली. स्व. शिवाजीराव देशमुख, स्व. नानासाहेब महाडिक यांनी मतदारसंघाची सेवा केली. आम्ही सर्वानी वसा पुढे चालू ठेवला. विरोधक आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
साखर सम्राट जनतेला तिरस्कार आला आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वारणा डावा कालवा लिफ्ट योजना पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. संभाजी महाराज स्मारक पूर्ण करणार आहे. शिराळा येथील नागपंचमीची उत्सव परंपरेप्रमाणे सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. शिराळा पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
'आम्ही कायम एकनिष्ठ राहू'
माझी झालेली बंडखोरी, त्यातून आलेली नाराजी, परत घेतलेला माघारी अर्ज हे फक्त पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने केले आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्ही कायम एकनिष्ठ राहू. सत्यजित देशमुख यांच्या विजयात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा मोठा वाटा आहे. शिराळा आणि वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अगदी शिलेदारासारखे काम केले. आम्हीं केलेल्या कष्टाचे चीज झाले, असे सम्राट महाडिक म्हणाले.
खुंदलापूर गावात मानसिंगराव नाईक यांना एकही मत नाही
खुंदलापूर या चांदोली अभयारण्य लगतच्या गावात मानसिंगराव नाईक यांना एकही मत मिळाले नाही. तर या गावात सत्यजित देशमुख यांना २२८ मते मिळाली.
शिराळा विधानसभेसाठी सहा उमेदवार रिंगणात
१) भाजप -सत्यजित शिवाजीराव देशमुख - १३०७३८
२) शरदचंद्र पवार पक्ष -मानसिंगभाऊ फत्तेसिंगराव नाईक - १०८०४९
३) बहुजन समाज पार्टी - गौस बाबलाल मुजावर - ५९६
४) अपक्ष अनिल रंगराव अलूगडे - २२६५
५) अपक्ष जीतूभाऊ शिवाजीराव देशमुख -१०६६
६) अपक्ष मानसिंग ईश्वरा नाईक - ४७२
७) नोटा - ६६४
८) टपाली बाद मते- ३३१