जे उसाचे पैसे देत नाहीत, कुकडीचे पाणी, रस्ते याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना कुठलीच विचारणा होत नाही, असे विदारक चित्र या निवडणुकीत पाहावयास मिळाले. आम्ही मात्र शेतकरीहिताचे काम करत राहणार आहे, असा विश्वास नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केला.
नागवडे साखर कारखान्याचा सुवर्ण महोत्सवी 50वा गळीत हंगाम प्रारंभ व बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, डी. आर. काकडे, विश्वनाथ गिरमकर, दिनेश इथापे, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे उपस्थित होते.
या वेळी बॉयलरची विधिवत पूजा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके व मीनाक्षी नेटके, संचालक सावता हिरवे व अरुणा हिरवे यांच्या हस्ते, तर गव्हाण पूजन संचालक बंडू जगताप व अल्पना जगताप व काटा पूजन संचालक विठ्ठल बापू जंगले व कल्पना जंगले यांच्या हस्ते करण्यात आले.
सहकारी साखर कारखाने खासगी होत असल्यामुळे स्पर्धा वाढत आहे शेजारील दौंड शुगर, अंबालिका साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढली. आपण त्यांच्या बरोबरीने उसाला भाव देत आहोत.
भविष्यकाळ ओळखून सहकार टिकविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गेल्या वर्षी ऊसतोडणी मजुरांनी फसविले. त्यामुळे अडचण झाली. या वेळी ऊसतोडणी मजूर व हार्वेस्टर आहेत. नागवडे कारखाना साडेसहा हजार मेट्रिक टन दररोज गाळप करेल, असा विश्वास नागवडेंनी या वेळी व्यक्त केला.
भोस म्हणाले की, काहींनी 2900 रुपयांची घोषणा करून प्रत्यक्षात शेतकर्यांना तेवढे पैसे दिले नाहीत. नागवडे कारखाना 30 हजार सभासदांना साखर देतो. सर्व शेतकर्यांना उसाला भाव समान देतो, असे सांगितले. प्रास्ताविक सुभाष शिंदे यांनी केले.