समुद्रतळाशी असलेल्या केबल्सच्या माध्यमातून इंटरनेट चालते. Pudhari File Photo
Published on
:
18 Nov 2024, 11:42 pm
Updated on
:
18 Nov 2024, 11:42 pm
लंडन : समुद्रतळाशी असलेल्या केबल्सच्या माध्यमातून इंटरनेट चालते. संपूर्ण जगभरात समुद्राखाली या जाडजूड केबल्सचे जाळे आहे. या डेटा केबल्स इतक्या मजबूत आणि मोठ्या संख्येने असतात की शार्कसारख्या सागरी जलचरही त्यांची हानी करू शकत नाहीत. या केबल्सचे काम कसे चालते हे तुम्हाला माहिती आहे का?
सध्याच्या काळात मोठ्यात मोठा डेटा या सागरी केबल्सच्या माध्यमातून ट्रान्सफर केला जातो. त्यांना सबमरीन कम्युनिकेशन म्हटले जाते. इंटरनेटही अशाच केबल्सच्या सहाय्याने काम करते. या केबल्स लावण्यासाठी स्पेशल केबल-लेयर नावांचा वापर केला जातो, ज्या समुद्राच्या पृष्ठभागावर चालतात. त्यानंतर हाय प्रेशर वॉटर जेट तंत्राच्या माध्यमातून उथळ पाण्यात केबल्सना समुद्रतळाशी बसवले जाते. या केबल्सच्या माध्यमातूनच गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्याही डेटा ट्रान्सफर करतात. सॅटेलाईटस्च्या तुलनेत सागरी केबल्स डेटा ट्रान्सफर करण्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. याशिवाय सागरी केबल्सचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्या किफायतशीर असतात व त्यांचे नेटवर्क फास्ट असते. सॅटेलाईट कम्युनिकेशन कठीण असते. तसेच सॅटेलाईट अंतराळात सोडणे हे खर्चिकही आहे. अर्थात डॅमेज झालेले सबमरीन कम्युनिकेशन ठीक करणे हे एक आव्हानात्मक काम असते. या केबल्सना पकडून त्यांना पृष्ठभागापर्यंत खेचून आणण्यासाठी रोबोटस्चा वापर करून स्पेशल शिप पाठवले जातात. एका रिपोर्टनुसार एका दिवसात 100 ते 200 किलोमीटरपर्यंतच केबल्स टाकल्या जाऊ शकतात. ज्यावेळी नव्या केबल सर्व्हिसमध्ये येतात, त्यावेळी जुन्या केबल्स डिअॅक्टिवेट केल्या जातात. अशा प्रकारे अॅक्टिव केबल्सची संख्या सातत्याने बदलत राहते. अतिशय खोल समुद्रातही तळाशी अशा केबल्स टाकलेल्या आहेत. एक केबल सुमारे 25 वर्षे सर्व्हिस देते. त्यांच्यामध्ये खराबी आल्यावर रोबो डागडुजी करतात.