जिल्ह्यातील सर्व आठही मतदारसंघांत चुरशीच्या, लक्षवेधी लढती होत आहेत.
Published on
:
20 Nov 2024, 12:32 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:32 am
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवार, दि. 20 नोव्हेंबररोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतील 99 उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद होणार आहे. जिल्ह्यातील सर्व आठही मतदारसंघांत चुरशीच्या, लक्षवेधी लढती होत आहेत. त्यामुळे मतदानही चुरशीने होणार, हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय राजकीय प्रतिष्ठेची बनली आहे.
जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसंघांत एकूण 25 लाख 36 हजार 65 मतदार आहेत. त्यामध्ये दिव्यांग आणि 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक 3 हजार 555 आहेत. त्यापैकी 3 हजार 440 मतदारांचे घरी जाऊन मतदान घेतलेले आहे. आता उर्वरीत 25 लाख 32 हजारांवर मतदारांसाठी बुधवारी जिल्ह्यात 2 हजार 482 केंद्रांवर मतदान होत आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ (भाजप), महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) आणि काँग्रेस बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्यात ही निवडणूक चुरशीने होत आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत 58.29 टक्के मतदान झाले होते, यावेळी मात्र मतदान वाढेल, असे चित्र आहे.
मिरज विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पालकमंत्री सुरेश खाडे (भाजप),
महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते (शिवसेना उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांच्यात लढत होत आहे. 2019 च्या निवडणुकीत 55.15 टक्के म्हणजे जिल्ह्यात निचांकी मतदान झाले होते. यावेळी मात्र मतदानाचा टक्का वाढेल, असे दिसत आहे.
‘भूमीपूत्र-उपरा’मुळे जत लक्षवेधी
जत विधानसभा निवडणूक भूमीपूत्र आणि उपरा या मुद्द्यावरच अधिक गाजली. त्यामुळे येथील लढत लक्षवेधी ठरत आहे. महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर (भाजप), महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत (काँग्रेस) आणि भाजप बंडखोर तम्मनगौडा रवि-पाटील यांच्यात ही निवडणूक चुरशीने होत आहे. 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 64.52 टक्के मतदान झाले होते. आता यावेळी मतदान किती होणार याकडे लक्ष लागले आहे.
‘शिराळा’, ‘खानापूर’मध्ये होणार उच्चांक
शिराळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) आणि महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख (भाजप) यांच्यात चुरशीने लढत होत आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक 78.36 टक्के मतदान झाले होते. यावेळीही मतदानाचा टक्का अधिक असणार, असे चित्र आहे. खानापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास बाबर (शिवसेना), महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अशी तिरंगी लढत चुरशीने होत आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत 67.11 टक्के मतदान झाले होते. यावेळी तिरंगी लढत असल्याने मतदानाचा टक्का वाढणार हे स्पष्ट आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम (काँग्रेस) व महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात चुरशीने लढत होत आहे. या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागत आहे. दहा वर्षांनी होत असलेल्या ‘कदम-देशमुख’ लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत 74.19 टक्के मतदान झाले होते. आता यावेळीही मतदानात चुरस दिसेल, असे संकेत मिळत आहेत.