सावंतवाडी ः मतदारसंघात मतदान यंत्रे रवाना करताना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे. सोबत सौरभ कुमार अग्रवाल, निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, श्रीधर पाटील आदी. (छाया ः हरिश्चंद्र पवार)
Published on
:
20 Nov 2024, 1:10 am
Updated on
:
20 Nov 2024, 1:10 am
सावंतवाडी : राज्य विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व 310 मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचार्यांना पाठवण्यास मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली.
मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत हेमंत निकम आणि सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी याचे नियोजन केले. सकाळी ईव्हीएम मशीन व इतर सामग्री नियुक्त कर्मचार्यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी पोलिस अधिकारी उपस्थित होते. सर्व निवडणूक कर्मचार्यांना पोलिसांसोबत त्यांना नेमून देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. यासाठी 38 एसटी गाड्या व तीन मिनी बसेस ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांतील 390 मतदान केंद्रांवर हे कर्मचारी रवाना झाले. सावंतवाडी जिमखाना मैदान येथे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे व जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल जिल्ह्यातील निवडणूक केंद्रांना भेट देत आहेत. पोलिस महानिरीक्षक संजय दरोडे व पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी मंगळवारी सावंतवाडी जिमखाना मैदान येथे सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे ईव्हीएम मशिन इतर साहित्य ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकूण 310 मतदान केंद्रे असून यासाठी 1500 कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत, तर पोलिस कॉन्स्टेबल व होमगार्ड मिळून एकूण 600 पोलिस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर कर्मचार्यांना नेण्यासाठी एसटीच्या 38 गाड्या व तीन मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण 2 लाख 30 हजार मतदार असल्याची माहिती हेमंत निकम यांनी दिली.