Published on
:
19 Nov 2024, 11:35 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:35 pm
प्रिटोरिया : 1978 मध्ये जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली होती. त्यानंतर जगभरात आतापर्यंत हजारो टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म झालेला आहे. मात्र, हे ‘आयव्हीएफ’चे तंत्र सिंहांबाबतही वापरण्यात आले होते, हे तुम्हाला माहिती आहे का? टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाद्वारे दक्षिण आफ्रिकेमध्ये सिंहाच्या दोन छाव्यांचा जन्म झाला होता. कृत्रिम गर्भाधानद्वारे जन्माला आलेली जगातील ही पहिली जोडी आहे.
प्रिटोरिया विद्यापीठातील संशोधक आफ्रिकेतील सिंहाच्या प्रजनन तंत्राबाबत संशोधन करत होते. त्यावेळी ‘आयव्हीएफ’ म्हणजे कृत्रिम गर्भधारणा पद्धतीचा वापर करून 25 ऑगस्ट 2018 मध्ये या दोन्ही छाव्यांचा जन्म झाला. यामध्ये एक नर आणि एका मादीचा समावेश आहे. 18 महिन्यांचे परीक्षण आणि मेहनतीनंतर संशोधकांना हे यश आले. या दोन्ही छाव्यांसाठी एका सिंहाचे शुक्राणू घेतले होते. त्यानंतर जेव्हा सिंहिणीचा हार्मोनचा स्तर सामान्य अवस्थेत आल्यानंतर सिंहाच्या शुक्राणूंना कृत्रिम पद्धतीने ट्रांसपोर्ट केले. ‘सिंहाप्रमाणे इतर प्राण्यांची निर्मितीही कृत्रीम पद्धतीने करता येऊ शकते. ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना वाचवले जाऊ शकते’, असे संशोधक आंद्रे गांसविंड यांनी सांगितले. आफ्रिकेच्या 26 देशांतील सिंहाच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.