सुप्रिया सुळे - नाना पटोले यांच्या विरोधात माझ्याकडे सर्व पुरावे:फॉरेन्सिक तपासणीनंतरच आरोप केल्याचा रवींद्रनाथ पाटील यांचा दावा

3 days ago 2
महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी उघडकीस आलेल्या बिटकॉइन घोटाळ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या प्रकरणात ऑडिओ हे फेक असल्याचे सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी म्हटले आहे. मात्र, आपल्याकडे सुळे आणि पटोले यांच्या विरोधातील सर्व पुरावे असल्याचा दावा या प्रकरणातील प्रमुख आरोपकर्ते माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे रवींद्रनाथ पाटील हे 2022 मध्ये बिटकॉईनशी संबंधित एका प्रकरणात तुरुंगात गेले होते. 14 महिने तुरुंगात होते. पण आता या गेममध्ये अनेक लोक गुंतले होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचेही ते म्हणाले. सुळे आणि पटोले यांच्या ऑडिओ क्लिपची योग्य पद्धतीने आपण तपासणी केली असल्याचा दावाही त्यांनी केला. मी स्वत: फॉरेन्सिक एक्सपर्ट असून सर्व पुरावे तपासल्यानंतरच आपण आरोप केले असल्याचा दावा देखील पाटील यांनी केला आहे. नेमका आरोप काय? माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. बिटकॉइनच्या माध्यमातून निवडणुकीला निधी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. पाटील म्हणाले की, "2018 मध्ये गेन बिटकॉइन नावाची पॉन्झी स्कीम चालवली जात होती. त्यात दिल्लीतील रहिवासी असलेल्या अमित भारद्वाज नावाच्या व्यक्तीने एक बिटकॉईन दिल्यास 1.8 बिटकॉइन्स मिळतील, अशी योजना केली होती. 18 महिने "बऱ्याच लोकांनी बिटकॉइन रोखीने घेतले, ज्याची नंतर पडताळणी होऊ शकली नाही." सायबर क्राईमध्ये तक्रार - सुप्रिया सुळे या संदर्भात शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रवींद्र पाटील हे एक बोगस आयपीएस अधिकारी होते. ते दोन वर्षे जेलमध्ये राहून आले आहेत. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात मी सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी मी यावर चर्चा केली आहे. बिटकॉनविरोधी जर संसदेत कोणी सर्वाधिक बोलले असेल तर मी बोलले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मानहाणीची नोटीस बजावण्यात येणार - पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीत बिटकॉईनच्या वापराविषयी भाजपने केलेला आरोप जोरकसपणे फेटाळून लावला आहे. भाजपने रवींद्र पाटील नामक जो आयपीएस अधिकारी उभा केला आहे, तो मुळात आयपीएसच नाही. तो एक तोतया आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला हे बिटकॉईन प्रकरण समजत नाही. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मानहाणीची नोटीसही बजावण्यात येणार आहे, असे पटोले यांनी म्हणाले आहे. आवाज सुळे-पटोलेंचाच - अजित पवार या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा या दोघांचाच आवाज असण्याची शक्यता वर्तवली आहे. या संदर्भात अजित पवार म्हणाले की, "जे काही ऑडिओ क्लिप दाखवले जात आहे, मला एवढेच माहित आहे की, मी या दोघांसोबत काम केले आहे. त्यापैकी एक माझी बहीण आहे. दुसरे असे आहेत ज्यांच्यासोबत मी काम केले आहे. त्यांचा आवाज मला ओळखता येतो. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर सर्व 'राज' म्हणजेच सर्व सत्य स्पष्ट होईल.' असे पवार यांनी म्हटले आहे. सत्य सर्वांसमोर यायला हवे - फडणवीस या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर विदेशी निधी वापरल्याचा आरोप केला. दोघांची एक ध्वनीफित प्रसारित केली आहे. या संदर्भात योग्य चौकशी झाली पाहिजे. काय खरे आहे हे सर्वांसमोर आले पाहिजे. आरोप खरेच गंभीर आहे. गंभीर आरोपाची सखोल चौकशी होऊन त्यातून सत्य बाहेर येण हा जनतेचा अधिकार आहे असे फडणवीस यांनी सांगितले. व्हॉइस रेकॉर्डिंगमधील आवाज सुप्रियाताईचा असल्याचे जाणवत आहे. याची चौकशी होवून सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article