गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर शुक्रवारी (दि. २९) भारतीय शेअर बाजार सावरला.(file photo)
Published on
:
29 Nov 2024, 5:44 am
Updated on
:
29 Nov 2024, 5:44 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर शुक्रवारी (दि. २९) भारतीय शेअर बाजार सावरला. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून ७९,७०० वर पोहोचला. तर निफ्टी १९० अंकांनी वाढून २४,१०० वर व्यवहार करत आहे.
आयटी शेअर्समधील प्रॉफिट बुकिंगमुळे गुरुवारी सेन्सेक्स- निफ्टी प्रत्येकी १.५ टक्के घसरले होते. पण आज बाजारात रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स आज ७९,०३२ वर खुला झाला. त्यानंतर तो ७९,७०० अंकापर्यंत वाढला. सेन्सेक्सवर सन फार्मा, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, एचसीएल टेक, एलटी, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, बजाज फायनान्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर पॉवर ग्रिड शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
एनएसई निफ्टीवर सिप्ला, सन फार्मा, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर श्रीराम फायनान्स, एसबीआय लाईफ हे शेअर्स घसरले आहेत.
अदानींना मोठा दिलासा, शेअर्स १२ टक्क्यांपर्यंत वाढले
दरम्यान, आज अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स १२ टक्क्यांपर्यंत वाढले. अमेरिकेतील कोर्टाने अदानींवर लाचखोरीचा आरोप ठेवला असतानाही गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समुहाशी संबंध कायम ठेवण्याची जपानच्या सर्वात मोठ्या बँकांची योजना असल्याच्या वृत्तानंतर आज शुक्रवारी अदानी शेअर्समध्ये तेजी आली. सकाळच्या व्यवहारात अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर्स १२ टक्के वाढला. अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर हे शेअर्स प्रत्येकी ३ ते ५ टक्के वाढले.
जपानी बँक मिझुहो फायनान्शियलने असा विश्वास व्यक्त केला आहे की अदानी समुहाला सहकार्य कायम ठेवण्याची त्यांची योजना आहे, असे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. त्याचप्रमाणे सुमितोमो मित्सुई फायनान्शिअल आणि मित्सुबिशी यूएफजे फायनान्शिअलनेदेखील अर्थसाह्य मागे घेण्याची कोणतीही योजना नाही आणि उलट गरज पडल्यास ते नव्याने वित्तपुरवठा करतील, असे वृत्तात पुढे म्हटले आहे. या वृत्तानंतर अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.