सैबेरियात 35 हजार वर्षांपूर्वीच्या मांजराच्या पिलाची ‘ममी’ सापडली आहे.Pudhari File Photo
Published on
:
19 Nov 2024, 11:45 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:45 pm
मॉस्कोः सैबेरियाच्या पर्माफ्रॉस्टमध्ये प्रागैतिहासिक काळातील अनेक प्राण्यांचे बर्फात सुरक्षित राहिलेले देह सापडलेले आहेत. आताही किमान 35 हजार वर्षांपूर्वीच्या साबर-टूथ्ड कॅटच्या म्हणजेच मार्जार कुळातील लांबलचक सुळे असणार्या प्राण्याच्या नवजात पिलाची ‘ममी’ सापडली आहे. या पिलाच्या मृत्यूला हजारो वर्षे झालेली असली, तरी आजही त्याच्या त्वचेवरील फर आणि अगदी मिशाही शाबूत आहेत!
या पिलाचे डोके व शरीराचा वरचा भाग अतिशय चांगल्या प्रकारे जतन झालेला आहे. सध्याच्या रशियातील ईशान्येकडील साखा रिपब्लिकच्या किंवा याकुतियाच्या भागात एकेकाळी या पिलाचा जन्म झाला होता. जन्मानंतर अवघ्या तीनच आठवड्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एखाद्या साबर-टूथ्ड कॅटचा इतक्या चांगल्या प्रकारे जतन झालेला देह सापडणे ही एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे. हा प्राणी ‘होमोथेरियम लॅटिडन्स’ या कुळातील आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘होमोथेरियम’ या लुप्त झालेल्या जीनसमधील हे प्राणी होते. त्यांचा काळ 5.3 दशलक्ष ते 2.6 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या प्लिओसीन आणि 2.6 दशलक्ष ते 11,700 वर्षांपूर्वीच्या प्रारंभिक प्लिस्टोसीन युगाचा आहे. प्लिस्टोसीन काळालाच शेवटचे हिमयुग म्हटले जाते. या युगाच्या अखेरपर्यंत त्यांची संख्या कमी झाली होती. या ममीवरून असे दिसून येते की एच. लॅटिडेन्स हे हिमयुगातील स्थितीला चांगल्या प्रकारे सरावलेले होते. त्या काळाची अनेक वैशिष्ट्ये तसेच या प्राण्यांचीही अनेक वैशिष्ट्ये आता पिलाच्या ममीच्या अभ्यासावरून समजून घेता येऊ शकतील.