सोलापूरच्या राजकारणात भूकंप! शिंदे पिता-पुत्रीचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबाfile photo
Published on
:
20 Nov 2024, 8:04 am
Updated on
:
20 Nov 2024, 8:04 am
सोलापूर : Maharashtra Assembly Polls | दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार अमर पाटील यांची कोंडी झाली आहे.
सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे यांनी मतदान केल्यानंतर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याची माहिती बुधवारी माध्यमांना दिली. यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा मतदार संघ आहे. येथून मी दोनवेळा निवडणूक लढविली आहे. जागा वाटपात ठाकरे शिवसेनेने घाई केल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनाला सुटला. मात्र येथे काँग्रेसची मोठी ताकद आहे. तसेच धर्मराज काडादी हे शांत, संयमी उमेदवार असल्याने ते सर्वांचे ऐकून घेतात. त्यांना पुढे मोठे भविष्य असल्याने काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे.
दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दक्षिण सोलापूर हा मतदार संघ ठाकरे शिवसेना गटाला सुटला आहे. येथून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने शिवसेना उमेदवाराची कोंडी झाली आहे.