शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल एकनाथ शिंदेंबाबत एक मोठा खुलासा केला . एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीला उपमुख्यमंत्री होण्यास नकार दिला, मात्र सर्व आमदारांनी आग्रह केल्याने त्यांचा मान ठेवत शिंदेंनी हे पद स्वीकारलं, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेवर निशाणा साधत टोला हाणला. ” काही करून सत्तेत राहायचं ही यांची भूमिका आहे.हायकमांडचा आदेश शिंदेंनी पाळला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं. काय केलं असतं. पर्याय काय होते? कोणताही पर्याय नव्हता. कातडी वाचवण्यासाठी ते उपमुख्यमंत्री बनले” अशी टीका राऊत यांनी केली.
नोव्हेंबर महिन्यात राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. त्यामध्ये 132 या सर्वाधिक जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले आणि मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मात्र या निर्णयामुयळे एकनाथ शिंदे हे नाराज होते. सर्व आमदारांनी आग्रह केल्याने त्यांचा मान ठेवत शिंदेंनी हे पद स्वीकारलं, असं गुलाबराव पाटील म्हणाले. त्यावरच राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय राऊत ?
एकनाथ शिंदेंकडे कसले गौप्यस्फोट आहे. फडणवीस मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी हायकमांडचा मान राखला. काही करून सत्तेत राहायचं ही यांची भूमिका आहे. एकनाथ शिंदे सीएम होते. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली. त्यांना 2024 नंतर मुख्यमंत्री ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं, तरीही ते मुख्यमंत्री झाले नाही. मग कार्यकर्त्यांचा मान राखण्याचा प्रश्न येतो कुठे. भाजप हे एकनाथ शिंदेंचं हायकमांड आहे. त्यांनी आदेश दिला, तुम्हाला स्वीकारावं लागलं. याचा मान राखला, त्याचा मान राखला हे तर्कसंगत नाही. फडणवीस यांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला, त्याच हायकमांडचा आदेश शिंदेंनी पाळला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं. काय केलं असतं. पर्याय काय होते? कोणताही पर्याय नव्हता. कातडी वाचवण्यासाठी, खटले थांबवण्यासाठी सरकारमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तो त्यांचा प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले.