स्वातंत्र्यानंतरही हिंदुस्थानचा समृद्ध इतिहास दडविला गेला:इतिहासाची मोडतोड करण्यात झाली, अभिनेते शरद पोंक्षे यांचा आरोप
4 days ago
2
विश्व रानटी अवस्थेत जगत असताना सुसंस्कृत जीवनपद्धती जगणारा देश अशी हिंदुस्थानची ओळख होती. आक्रमणकर्त्यांमुळे हिंदू संस्कृतीची मोडतोड झाली. इंग्रजांच्या राजवटीत देशवासीयांना मानसिक, बौद्धिक पातळीवर दुबळे बनविले गेले. हिंदुस्थानची समृद्ध संस्कृती स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही दडपली गेली. हिंदूंनो आता तरी जावे व्हा, निदान स्वातंत्र्यानंतरचा इतिहास तरी वाचा त्यातून देशाचे वाटोळे कुणी केले हे तरी समजेल, असे परखड प्रतिपादन सावरकर अभ्यासक, अभिनेते, लेखक शरद पोंक्षे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे ‘सावरकर : एक क्रांतिज्वाला’ या विषयावर आयोजित व्याख्यानात पोंक्षे बोलत होते. निगडी प्राधिकरणातील मनोहर वाढोकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात सावरकर साहित्य अभ्यासक, वक्ते अक्षय जोग यांची प्रमुख उपस्थिती होते. स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, विक्रम दिवाण, कृष्णा वैद्य, अतुल रेवाणीकर मंचावर होते. संस्थेचा पदवितरण सोहळा या प्रसंगी झाला त्यात अमित सबनीस (ठाणे शहराध्यक्ष), आदीश जोशी (ठाणे शहर कार्याध्यक्ष), विदुला शेट्टीगार (अंबरनाथ शहर प्रमुख),एस वर्बे (महाराष्ट्र राज्य समन्वयक) यांना पद बहाल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण हिंदू म्हणून जगू शकलो नसतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरुस्थानी मानून आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वेचले, असे नमूद करून शरद पोंक्षे म्हणाले, देशाचा वैभवशाली इतिहास शिक्षणपद्धतीत असावा यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आग्रही होते. पण इतिहासाची मोडतोड करून इतिहास शिकविला गेला. इतिहासात कुणाला रस नाही, संस्कृतीविषयी अभिमान नाही असे असताना भविष्य ठरविणार कसे? इतिहास वाचा कारण इतिहास भविष्य ठरवायला मदत करतो असे स्वातंत्र्यवीर सावरकर सांगत असत. आजही सरस्वतीचा अपमान होत आहे, हे विसरून कसे चालेल? राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करा, राष्ट्रासाठी खारीचा वाटा उचला, असे आवाहन पोंक्षे यांनी केले. अक्षय जोग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाविषयी विवेचन केले. प्रास्ताविकात स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. सावरकर क्रांतिज्वाला दिनदर्शिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर विविध देशांमध्ये पोहोचली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)