Published on
:
18 Nov 2024, 11:34 pm
Updated on
:
18 Nov 2024, 11:34 pm
लंडन : कुणाला कशाचा फोबिया म्हणजेच भयगंड असेल हे काही सांगता येत नाही. खरं तर आपल्या प्रत्येकाला कसली ना कसली भीती वाटत असते. कुणाला अंधाराची, तर कुणाला बंद लिफ्ट अगदी झुरळ, पालीचीही भीती वाटणारी माणसं आपल्या आजूबाजूला आपण पाहिली आहे, पण तुम्ही कधी ऐकलं आहे किंवा बघितलं का, की फळांची आणि तेही केळीसारख्या फळाची कोणाला भीती वाटू शकते. तर हो, स्वीडनच्या सरकारमधील एक मंत्री महिला आहेत, त्यांना केळी दिसलं की त्या अस्वस्थ होतात. त्यांना ‘बनाना फोबिया’ आहे!
स्वीडनच्या लैंगिक समानता खात्याच्या मंत्री पॉलिना ब्रॅंडबर्ग यांना हा विचित्र फोबिया आहे. त्या केळं खाणे सोडाच, केळाचं नाव घेतलं तरी अस्वस्थ आणि बेचैन होतात. त्यामुळे त्यांना नजरेसमोर केळं येऊ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते. कारण केळं दिसलं की त्या थरथर कापतात. एका महिला मंत्रीला अशा विचित्र गोष्टीची भीती वाटणे हे अतिशय थक्क करणारी गोष्ट आहे. पण यामागील कारणही अतिशय महत्त्वाचं आहे. खुद्द पॉलिना यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2020 मध्ये तिला बनाना फोबियाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. खरं तर ती पोस्ट काही दिवसांनी डिलीट करण्यात आली होती. पण या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, त्यांना ‘बनाना फोबिया’ आहे म्हणजे त्यांना केळाचं नाव घेतली तरी भीती वाटते. त्याशिवाय ही गोष्ट अशा प्रकारे लिक झाली की, एक्स्प्रेसन या स्थानिक मीडिया आउटलेटच्या हाती एक इमेल्स लागलं. त्यात मंत्री पॉलिना यांच्या व्हीआयपी लंचबाबत सूचना देण्यात आल्या होता. त्याशिवाय त्यांच्या अधिकृत दौर्यादरम्यान त्या जिथे जिथे जातील तेथील कर्मचार्यांना सांगण्यात आलं होतं की, त्यांना केळी दिसणार नाही याची व्यवस्था करावी. मंत्री पॉलिना यांनीही एक्स्प्रेसनला त्यांच्या फोबियाबद्दल सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की, ही एक भीती असून एखाद्या अॅलर्जीसारखा हा आजार असतो. यासाठी वैद्यकीय मदतही घ्यावी लागते. खरं तर अशा प्रकारची भीती बसण्यामागील कारण अजून डॉक्टरांनाही माहिती नाही. मात्र बालपणीची कुठल्या घटना किंवा अनुभवानंतर ही भीती बसू शकते, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.