हिंगोली जिल्ह्यात महायुतीने गड राखला:वसमतमध्ये शिष्य ठरला भारी, हिंगोलीत भाजपाची हॅट्ट्रीक, कळमनुरीत बाण विजयी
3 hours ago
1
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात महायुतीने गड राखला असून संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेल्या कळमनुरी विधानसभा मतदार संघात शिंदेसेनेचे संतोष बांगर यांनी विजय मिळविला आहे. तर वसमतमध्ये राजकिय गुरुवर शिष्य भारी ठरला असून राजेश नवघरे विजयी झाले आहेत. हिंगोलीत भाजपाचे तान्हाजी मुटकुळे यांच्या रुपाने भाजपाने हॅट्ट्रीक साधली आहे. कळमनुरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने रान उठविले होते. तर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिंगोलीत सभा घेतली होती. त्यामुळे या विधानसभा मतदार संघाकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत शिंदेसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे डॉ. संतोष टारफे यांचा पराभव करून विजय मिळविला. वसमत विधानसभा मतदार संघात माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर विरुध्द विद्यमान आमदार राजेश नवघरे या राजकिय गुरु शिष्यामध्ये लढत झाली. यामध्ये शिष्य राजेश नवघरे भारी ठरले असून त्यांनी एकहाती विजय मिळविला आहे. हिंगोली विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त २३ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. त्यामुळे मतविभाजन अटळ झाले होते. मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार याचीच चर्चा सुरु झाली होती. मात्र विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवत विजय मिळविला आहे. या विजयाने भाजपाचे मुटकुळे यांनी हॅट्ट्रीक साधली आहे. आता पुढे काय हिंगोली जिल्हयात महायुतीच्या विरोधात वातावरण असतांनाही उमेदवारांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन किल्ला लढविला आहे. तिघांनीही विजय मिळविल्यानंतर आता हिंगोली, कळमनुरी वसमत पालिका निवडणुकीसोबतच औंढा नागनाथ व सेनगाव नगर पंचायतीकडे राजकिय पक्षांंचे लक्ष लागले आहे. तसेच हिंगोली जिल्हा परिषदेसह हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव औंढा नागनाथ पंचायत समितीच्या निवडणुका पुर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी केली जाणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)